लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : फवारणी करताना विषबाधा होऊन विदर्भात अनेक शेतकर्यांचे प्राण गेले आहेत. त्यामुळे, शासनाने कीटकनाशक औषधांचे नमुने घेऊन १३ औषधांच्या वापरावर बंदी घातलेली आहे; मात्र या बंदी घातलेल्यांपैकी चार ते पाच औषधांची खुलेआम विक्री होत असल्याचे लोकमतने २८ नोव्हेंबर रोजी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये समोर आले आहे. तेल्हारा, बाळापूर, पातूर, मूर्तिजापूर, बाश्रीटाकळी, पिंजर व वाडेगाव येथे काही औषधांची विक्री होत असल्याचे समोर आले आहे. लोकमतने एकाच वेळी जिल्ह्यातील ११ ठिकाणी स्टिंग ऑपरेशन करून हे उघड केले आहे. फवारणी करताना विषबाधा झाल्याने यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यात अनेक शेतकर्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे, शासनाने अनेक औषधांचे नमुने घेऊन धोकादायक असलेल्या १३ औषधांवर बंदी घातली आहे. शेतकर्यांच्या जीवावर उठलेल्या या औषधांच्या विक्रीवर बंदी अस तानाही जिल्ह्यातील अनेक ठिकाणी ही औषधे मिळत असल्याचे वास्तव लोकमतने स्टिंग ऑपरेशन करून उघड केले आहे. १३ औषधांपैकी काही औषधांची नावे बदलून विक्री करण्यात येत असल्याचा प्रकार मूर्तिजापूर येथे उघडकीस आला. तेल्हारा येथे औषधे नसल्याचे विक्रेते सांगत असले तरी ओळखीच्या लोकांना या औषधांचा पुरवठा करण्यात येतो. पातुरात अनेक बंदी असलेल्या औषधांची विक्री करण्यात येत असल्याचे समोर आले. येथे दुकानदारांनी शक्कल लढवून एकही औषध दुकानात ठेवलेली नाही. ही औषधे ग्राहकाने मागितल्यास त्याला गोडावूनमधून काढून देण्यात येते. बाश्रीटाकळी येथीलही अनेक कृषी सेवा केंद्र संचालकानी औषध उपलब्ध असल्याचे सांगितले. बाळापूर येथे बंदी असलेल्या चार औषधांची सर्रास विक्री होत असल्याचा प्रकार स्टिंग ऑपरेशनमध्ये उघड झाला आहे. पिंजर आणि वाडेगावातही अनेक औषधे बिनदिक्कतपणे विक्री करण्यात येत आहेत. शेतकर्यांसाठी धोकादायक ठरलेली ही औषधे कृषी विभागाच्या आश्रीवादाने बिनदिक्कतपणे जिल्ह्यात विकण्यात येत असल्याचे लोकमतने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये समोर आले आहे. जिल्हय़ातील अकोट, हिवरखेड, पारस आणि बोरगावमंजू येथे बंदी असलेल्या औषधांची विक्री होत नसल्याचे या स्टिंगमध्ये स्पष्ट झाले.
येथे होते विक्री मूर्तिजापूर, बाळापूर, तेल्हारा, पातूर, बाश्रीटाकळी, वाडेगाव, पिंजर
येथे मिळाली नाहीत बंदी असलेली औषधे अकोट, हिवरखेड, पारस, बोरगावमंजू