अकोला, दि. २८: २१ वा विदर्भ केसरी ब्रजलाल बियाणी सेवाश्री पुरस्कार वितरण सोहळा रविवार, २८ ऑगस्ट रोजी गोरक्षण मार्गावरील खंडेलवाल भवनात पार पडला. यंदा हा पुरस्कार पातूर-चरणगाव येथील रहिवासी कृषिभूषण दादाराव आनंदराव देशमुख यांना प्रदान करण्यात आला. विदर्भ केसरी ब्रजलालजी बियाणी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, समाजाच्या उन्नतीसाठी विशेष कामगिरी करणार्या व्यक्तीस सन्मानित करण्याची ही परंपरा सेवाश्रयचे संस्थापक सत्यनारायण रांदड यांनी १९९५ मध्ये सुरू केली. वर्ष २0१६ चा सेवाश्री पुरस्कार वितरण सोहळा रविवारी खंडेलवाल भवनात पार पडला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून नागपूर येथील दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स युनिव्हर्सिटीचे कुलगुरू तथा ज्येष्ठ संपादक डॉ. वेदप्रकाश मिश्रा, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाबीजअकोला चे महाप्रबंधक अशोक अमानकर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पातूर-चरणगावचे रहिवासी कृषिभूषण दादाराव देशमुख यांना सपत्नीक २१ वा विदर्भ केसरी ब्रजलाल बियाणी सेवाश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. २0१५ चा २0 वा सेवाश्री पुरस्कार अकोल्याचे सानेगुरुजी न्यू इंग्लिश हायस्कूलचे मुख्याध्यापक मोरेश्वर उपाख्य छोटू मोर्शीकर गुरुजी यांना घोषित झाला होता. पुरस्कार स्वीकारणारे मोर्शीकर गुरुजी व पुरस्कार देणारे सत्यनारायण रांदड यांचे गतवर्षी निधन झाले. गतवर्षीचा हा २0 वा ह्यसेवाश्रीह्ण पुरस्कार रविवारी मान्यवरांच्या हस्ते मोर्शीकर गुरुजींचे बंधू अविनाश मोर्शीकर यांना सपत्नीक प्रदान करण्यात आला. पुरस्काराला उत्तर देताना दादाराव देशमुख यांनी पातूर तालुक्यात सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी केलेली कामगिरी स्पष्ट करून मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रमुख वक्ता म्हणून बोलताना डॉ. वेदप्रकाश मिश्रा म्हणाले, की समाज हा अनुकरणशील असतो. नि:ष्पक्ष, निरपेक्ष भावनेतून निष्काम सेवा करणारे मोती सेवाश्रीमध्ये गुंफले आहेत. ते समाजाला सातत्याने प्रेरणादायी ठरतील, असे त्यांनी सांगितले. अशोक अमानकर यांचे अध्यक्षीय भाषण झाले. सत्यनारायण रांदड यांचे सुपुत्र तथा क्विक अँडचे संस्थापक विजय रांदड यांनी कार्यक्रमाचे संयोजक म्हणून भूमिका सांभाळली. पुरस्कार वितरण सोहळय़ात विजय रांदड यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, नानासाहेब चौधरी, गोपाल खंडेलवाल, दिलीप बाबा, डॉ. हेडा, नारायण भाला, प्रकाश भंडारी, नीलेश मालपाणी, राजेश शर्मा यांच्यासह शहरातील अनेक गणमान्य उपस्थित होते. निवड समितीचे सदस्य प्रा. राजाभाऊ देशमुख, डॉ. राम प्रकाश वर्मा, राकेश पुरोहित, मनीष जोशी, डॉ. किरण वाघमारे, शौकतअली मीरसाहेब, रमेश बाहेती, हरीष मानधने, महेंद्र कविश्वर, प्रा. एस. के. शर्मा आदिंनी परिश्रम घतेले.
दादाराव देशमुख यांना सेवाश्री पुरस्कार
By admin | Published: August 29, 2016 1:27 AM