पातूर: पातूर तालुक्यातील ग्रामपंचायत वाहाळा बु. येथील सरपंच, ग्रामसेवकांनी गावठाणच्या शासकीय जमिनीचा बेकायदेशीरपणे ठराव घेऊन ही जमीन वनविभागाला दिल्याचा आरोप करीत उपसरपंचाने तहसीलदारांकडे तक्रार केली आहे.
उपसरपंच यांनी दिलेल्या निवेदनानुसार, वाहाळा बु. येथील गावठाणातील सरकारी जमीन गुरांच्या चराई क्षेत्राकरिता आहे. ही शासकीय जमीन सरपंचाने गावात सूचना न देता, ग्रामसभा न घेता, ग्रामसभेला विश्वासात न घेता, सरकारी जमिनीचा परस्पर ठराव घेऊन वन विभागास दिली. सद्यस्थितीत गावातील गुरे या शासकीय जमिनीत चराईसाठी जातात, परंतु सरपंच, ग्रामसेवकाने मिळून शासनाचा मालकीच्या जमीन परस्पर ठराव घेऊन वनविभागास दिला आहे. सरपंच व ग्रामसेवक यांनी परस्पर घेतलेला ठराव रद्द करावी, अशी मागणी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदन देताना उपसरपंच शशिकला श्यामराव मोरे, ग्रामपंचायत सदस्य शिवहरी बोरसे, ग्रामपंचायत सदस्य रेखाबाई सुरेश बोरसे, ग्रामपंचायत सदस्य मोहन मोरे, श्यामराव मोरे, मंगेश मोरे, धिरज मोरे व गावातील नागरिक व शेतकरी उपस्थित होते.
---------------