म्हणे...कोरोनाबाधित मृत व्यक्तीसाठी मनपाला अनुदान?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 10:47 AM2020-08-04T10:47:30+5:302020-08-04T10:47:40+5:30
विभाग प्रमुखांपासून ते आयुक्तांपर्यंत सर्वांनी चुप्पी साधने पसंत केल्यामुळे अकोलेकरांमध्ये संभ्रमाची स्थिती कायम आहे.
- आशिष गावंडे
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : महापालिका क्षेत्रात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी महापालिका प्रशासनाला २७ हजार रुपयांचे अनुदान प्राप्त होत असल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होताच अकोलेकरांमध्ये गैरसमज निर्माण झाला आहे. दरम्यान, यासंदर्भात महापालिका प्रशासनाने भूमिका स्पष्ट करणे गरजेचे असताना विभाग प्रमुखांपासून ते आयुक्तांपर्यंत सर्वांनी चुप्पी साधने पसंत केल्यामुळे अकोलेकरांमध्ये संभ्रमाची स्थिती कायम आहे.
संसर्गजन्य कोरोना विषाणूची साखळी खंडित करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी पुढाकार घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. नागरिक घराबाहेर निघताना तोंडाला रुमाल किंवा मास्क लावून बाहेर पडत असल्याचे दिसत आहे. कोरोनाचा सर्वाधिक धोका वयोवृद्ध नागरिक तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब तसेच हृदयाशी संबंधित आजार असलेल्या व्यक्तींना असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा वयोवृद्ध नागरिकांसाठी महापालिका प्रशासनाने भरतिया रुग्णालयात ह्यरॅपिड टेस्टह्ण ला प्रारंभ केला आहे. जुलै महिन्यातील दुसऱ्या आठवड्यापासून मनपा क्षेत्रात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत घसरण होत असल्याचे दिलासादायक चित्र समोर आले आहे. आज रोजी ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. अशा स्थितीत मनपा क्षेत्रात कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी महापालिकेला शासनाकडून २७ हजार रुपयांचे अनुदान प्राप्त होत असल्याचा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा धागा पकडून मध्यंतरी जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ग्रामीण भागातील एका मृत व्यक्तीच्या नातेवाइकांनी अनुदानाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी मनपातील काही कर्मचाऱ्यांनी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी सात हजार रुपयांची मागणी केल्याचाही आरोप मृताच्या नातेवाइकांनी केला होता. त्यानंतर मनपा प्रशासनाने २७ हजार रुपयांच्या अनुदानासंदर्भात भूमिका स्पष्ट करणे गरजेचे होते; परंतु प्रशासनाने साधलेल्या चुप्पीमुळे अकोलेकरांमध्ये गैरसमज व संभ्रमाची स्थिती कायम आहे. यासंदर्भात मनपा आयुक्त संजय कापडणीस यांच्याशी भ्रमणध्वनीवरून वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.
सामाजिक संस्थांकडून दुकानदारी
कोरोना बाधित व्यक्तीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी शहरातील काही सामाजिक संस्था सरसावल्या आहेत; परंतु यातही काही सामाजिक संस्थांनी मृत व्यक्तीच्या नातेवाइकांकडून पैसे उकळण्याचा गोरखधंदा सुरू केल्याची माहिती आहे.
यासंदर्भात कोणीही तक्रार करण्यास पुढे आले नसले तरी जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने लक्ष देऊन मार्ग काढण्याची गरज आहे.
माजी महापौर म्हणाले, हा खोडसाळपणा!
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी शासनाकडून कोणत्याही स्वरूपाचे अनुदान प्राप्त होत नाही.
सोशल मीडियाच्या माध्यमातून हा खोडसाळपणा केला असल्याचे माजी महापौर तथा महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.