शालेय विद्यार्थी ज्वारी, बाजरी व नाचणीपासून वंचित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 10:20 AM2020-10-03T10:20:26+5:302020-10-03T10:20:34+5:30
Students Mid day meal आजपर्यंतही विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात बदल होऊ शकला नसल्याचे चित्र समोर आले आहे.
अकोला : शालेय पोषण आहार अंतर्गत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या तांदुळात २५ टक्के कपात करून त्याऐवजी ज्वारी, बाजरी किंवा नाचणी यापैकी एका आहाराचा समावेश करण्याचे प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे राज्यातील स्वायत्त संस्थांना निर्देश होते. यासंदर्भात स्वायत्त संस्थांनी भारतीय अन्न महामंडळाकडे मागणी नोंदविणे अपेक्षित असताना स्वायत्त संस्थांनी शासनाच्या निर्देशांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळेच आजपर्यंतही विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात बदल होऊ शकला नसल्याचे चित्र समोर आले आहे.
शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली जानेवारी महिन्यात पार पडलेल्या बैठकीत जिल्हा परिषदांच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यावेळी पोषण आहारात बदल करण्याच्या मुद्यावर सविस्तर चर्चा पार पडली होती. जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात नव्या शैक्षणिक सत्राला प्रारंभ होणार असल्याने चालू शैक्षणिक सत्रादरम्यान विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारातील तांदुळाचे प्रमाण २५ टक्के कमी करून त्याऐवजी ज्वारी, बाजरी किंवा नाचणी या तीनपैकी एका पदार्थाचा आहारात समाविष्ट करण्याचे स्वायत्त संस्थांना स्पष्ट निर्देश होते. यासंदर्भात शिक्षण संचालकांनी (प्राथमिक) राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पोषण आहारात बदल करण्याची सूचना दिली होती. शालेय पोषण आहार योजना केंद्र पुरस्कृत असल्यामुळे यासंदर्भातील आहाराची मागणी भारतीय अन्न महामंडळाकडे करावी लागणार होती; परंतु आजपर्यंतही विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात बदल करण्यात आला नसल्याचे समोर आले आहे.
सामाजिक संघटनांची शासनाकडे धाव
सर्वसामान्य गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणाºया काही सामाजिक संघटनांनी यासंदर्भात शासनाकडे धाव घेतल्याची माहिती आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पोषण आहाराच्या संदर्भात लक्ष देण्याची मागणी होत आहे.