‘शाळा सिद्धी’ : १६०० पैकी ६९ शाळांनीच केले मूल्यमापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 03:40 PM2019-01-20T15:40:31+5:302019-01-20T15:40:53+5:30
अकोला : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत नुकताच असर २०१८ अहवाल जाहीर झाला असून, त्यानुसार जिल्ह्यातील ५० टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना बेरीज, वजाबाकी येत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली.
- प्रवीण खेते
अकोला : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत नुकताच असर २०१८ अहवाल जाहीर झाला असून, त्यानुसार जिल्ह्यातील ५० टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना बेरीज, वजाबाकी येत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली. अशातच शाळा सिद्धी उपक्रमांतर्गत शाळांची स्वयंमूल्यमापनाबाबत उदासीनता दिसून येत आहे.
महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या निर्देशानुसार शैक्षणिक सत्र २०१८ - १९ साठी राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी आपले मूल्यांकन व प्रमाणीकरण करणे तसेच शाळांची गुणवत्ता आश्वासित करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने देशभरात शाळा सिद्धी तर महाराष्ट्रात समृद्ध शाळा नावाने शाळांना स्वयंमूल्यमापन करणे अनिवार्य आहे; परंतु जिल्ह्यात यासंदर्भात शाळांची उदासीनता दिसून येत आहे. यंदा जिल्ह्यातील १६०० शाळांपैकी केवळ ६९ शाळांनीच स्वयंसिद्धी अंतर्गत स्वयंमूल्यमापन केल्याची बाब समोर आली आहे. शाळांची ही उदासीनता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास बाधक ठरत आहे.
३० जानेवारीपर्यंत मुदत
शाळा सिद्धी उपक्रमांतर्गत शाळांना आपल्या शाळेतील स्वयंमूल्यमापनासाठी ३० जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. जिल्ह्यातील शाळांना स्वयंमूल्यमापनासाठी केवळ १२ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे.
अशी आहे सद्यस्थिती
स्वयंमूल्यमापन झालेल्या शाळा - ६९
प्रक्रिया सुरू असणाऱ्या शाळा - १६०
मूल्यमापनच न झालेल्या शाळा - १६१२
अशी आहे कार्यपद्धती
शाळेतील संपूर्ण विद्यार्थ्यांची माहिती.
शाळेतील संपूर्ण शिक्षकांची माहिती.
७ क्षेत्र म्हणजे ४६ गाभा माणके
प्रत्येक गाभा मानकानुसार त्या-त्या स्तरांमध्ये सुधारणेचे नियोजन.
असे आहे स्वयंमूल्यमापन
शाळेतील उपलब्ध साधन, त्याची उपयुक्तता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ते पर्याप्त आहे का, याची पडताळणी करून त्यानुसार गुण द्यावे लागतात. (उदा. शाळांमधील ग्रंथालयात आवश्यक पुस्तकांची संख्या, विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होतो का. तसेच संगणक, शिक्षकांची संख्या, शिक्षकांच्या शिकवण्याची पद्धती आदींबाबतदेखील मूल्यमापन करून गुण द्यावे लागतात.)
श्रेणीनुसार गुण
श्रेणी - गुण
अ - ११२ ते १३८
ब - ६९ ते १११
क - ६८ किंवा पेक्षा कमी गुण
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचे गांभीर्य लक्षात घेऊन शाळांनी ३० जानेवारीच्या आत शाळा सिद्धी उपक्रमांतर्गत स्वयंमूल्यमापन करावे. या संदर्भात शाळांना सूचनादेखील दिली आहे.
- प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी, माध्यमिक, अकोला.