लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : नवी मुंबईतील जुई नगरातील बँक ऑफ बडोदावर दरोडेखोरांनी भुयार खोदून बँक लुटल्याची घटना रविवारी घडली. या घटनेच्या पृष्ठभूमीवर अकोल्यातील राष्ट्रीयीकृत व मल्टिस्टेट बँका सतर्क झाल्या असून, या बँकांनी सोमवारी सुरक्षेचा आढावा घेतल्याची माहिती आहे. शहरातील बँकांची सुरक्षा व स्ट्राँगरूम, त्यातील खातेदारांचे लॉकर सुरक्षित असून, बँकांना पुरेशी सुरक्षा व्यवस्था प्रदान केलेली आहे, अशी माहिती बँकांच्या अधिकार्यांनी दिली. मुंबईतील बँक ऑफ बडोदा शाखेजवळच्या दुकानातून ४0 फुटांचे भुयार खोदून दरोडेखोरांनी बँकेत प्रवेश केला आणि बँकेतील २७ लॉकर फोडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एकूण कोट्यवधी रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना रविवारी उघडकीस आली. या घटनेच्या पृष्ठभूमीवर शहरातील राष्ट्रीयीकृत व मल्टिस्टेट बँकांच्या सुरक्षिततेचा आढावा घेण्यात आला. शहरातील बँकांमध्ये भविष्यात अशा प्रकारची घटना घडण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. या दृष्टिकोनातून सर्वच बँकांच्या अधिकार्यांनी सोमवारी बँक व परिसरातील सुरक्षेच्या आढाव्याची माहिती घेतली. बँकांमध्ये लाखो खातेदारांचे अब्जावधी रुपये व सोन्याचे दागिने आहेत. त्यासाठी खातेदारांना लॉकर्स दिलेले आहेत. बँकांमधील स्ट्राँगरूममध्ये खातेदारांचे लॉकर्स आहेत. बँकांमधील स्ट्राँगरूम, त्यातील लॉकर्स सुरक्षित आहेत का, याचा या घटनेमुळे खातेदारांच्या मनामध्ये शंका उपस्थित होणे साहजिक आहे. त्यानुषंगाने बँक अधिकारी सतर्क झाले आहेत. त्यांनी बँक व परिसरातील सुरक्षेचा आढावा घेताना, तेथील सीसी कॅमेरा, अलार्म सिस्टीम आणि सुरक्षारक्षकांचा पहारा याबाबत माहिती जाणून घेतली असता, सर्वच बँका खातेदारांच्या पैशांबाबत खबरदार आणि तेवढय़ाच सतर्क असल्याचे दिसून आले. शहरातील स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आदी बँकांसोबतच अकोला अर्बन बँक, अकोला जनता कर्मशिअल बँक, बुलडाणा अर्बन बँक या मल्टिस्टेट बँकांमध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सतर्कता बाळगण्यात आली आहे.
राष्ट्रीयीकृत बँकांमधील लॉकर सुरक्षितअकोल्यातील राष्ट्रीयीकृत बँकांनी त्यांच्या लॉकरची सुरक्षा व्यवस्था चोख असल्याचे समोर आले. राष्ट्रीयीकृत बँकांमधील लॉकरही सुरक्षित असून, त्यादृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. बहुतांश राष्ट्रीयीकृत बँकांचे लॉकर तळमजल्यावर नसून, ते पहिल्या किंवा वरच्या माळय़ावर असल्याचेही बँक अधिकार्यांनी सांगितले. बँके तील लॉकर व सुरक्षा व्यवस्था चोख असल्याचे बँक अधिकार्यांनी स्पष्ट केले.
लॉकर व सुरक्षेची तपासणीराष्ट्रीयीकृत बँकांतील लॉकर रूम व कॅशियर विभागाची नियमित तपासणी करण्यात येते. एवढेच नव्हे, तर सुरक्षेची पाहणी अकोला पोलिसांकडून रोजच करण्यात येत असल्याचेही बँक अधिकार्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. लॉकर रूमची नियमित तपासणी अंतर्गत बाबीतूनही करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. लॉकर रूममध्ये रोजच ये-जा असल्याने अशा प्रकारची घटना राष्ट्रीयीकृत बँकेत घडणे शक्य नसल्याचेही यावेळी अधिकार्यांनी सांगितले.
मुंबई येथील बँकेतील दरोड्याच्या घटनेच्या पृष्ठभूमीवर आमच्या बँकेतील सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. आमचे सुरक्षारक्षक सतर्क असून, अलार्म सिस्टीम, सीसी कॅमेरे आदी व्यवस्था आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बँक सतर्क असून, खातेदारांच्या धनाची सुरक्षेविषयी आम्ही सजग आहोत. - नरेंद्र अग्रवाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अकोला जनता बँक.
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आमच्या बँकेमध्ये अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था आहे. तसेच २४ तास बंदूकधारी सुरक्षारक्षकांचा सतत पहारा असतो. - शंतनू जोशी, सचिव, अकोला अर्बन बँक.