शाळा सुरू, बसेस बंद; विद्यार्थ्यांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:32 AM2021-02-06T04:32:22+5:302021-02-06T04:32:22+5:30
कोरोना आजाराच्या पृष्ठभूमीवर संसर्ग होऊ नये म्हणून गतवर्षी मार्च महिन्यापासून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शाळा बंद करण्यात आल्या होत्या. शासनाने गत ...
कोरोना आजाराच्या पृष्ठभूमीवर संसर्ग होऊ नये म्हणून गतवर्षी मार्च महिन्यापासून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शाळा बंद करण्यात आल्या होत्या. शासनाने गत २३ नोव्हेंबरपासून आठवी ते बारावीचे वर्ग व आता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू केले. शाळा सुरू झाल्या; परंतु अद्यापही ग्रामीण भागातील एसटी महामंडळाच्या बस सुरू झाल्या नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी त्रास सहन लागत आहे.
बोरगाव मंजू गावात शाळा, महाविद्यालय, अभ्यासिका आदी शैक्षणिक संस्था आहेत. मध्यवर्ती ठिकाण असल्याने परिसरातील कानशिवणी, काटेपूर्णा, पळसो बढे, वाशिंबा आदी ग्रामीण भागातील विद्यार्थी बोरगाव मंजू शहरात शिक्षणासाठी येतात. परंतु ग्रामीण भागातील बसगाड्या सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांना बोरगाव मंजूसह अकोला शहरात जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. शिवाय मोठ्या प्रमाणावर शेतकरी व शेतमजूर यांनाही वेळ मिळत नाही. शिवाय स्वत:ची वाहनेसुद्धा नसल्याने आपल्या पाल्याला शाळेत पाठवावे, असे हा प्रश्न पडला आहे.
दरम्यान, अकोला आगारातून पूर्वी यळवण मार्गे कानशिवणी, पळसो बढे, मूर्तिजापूर, पळसो बढे मार्गे बोरगाव मंजू अकोला, मूर्तिजापूर, कानशिवणी, दुधलम मार्गे कवळा अशा बस फेरी सुरू होत्या; परंतु टाळेबंदी काळात सदर बस सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बंद केल्या होत्या. परंतु शासनाने पुन्हा शाळा सुरू केल्या; परंतु बस मात्र ग्रामीण भागातील जाणे बंद असल्याने, विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. संबंधित विभागाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून बस सुरू कराव्यात, अशी विद्यार्थ्यांसह पालकांची मागणी आहे.
फोटो: एसटी व विद्यार्थी
बोरगाव मंजू येथे थांबा देण्याची मागणी
बोरगाव मंजू येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जवळ बसला थांबा द्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालक व शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य भरत बोरे यांनी विभाग नियंत्रकांकडे केली आहे. दरम्यान, येथे बस थांबा नसल्याने जुन्या बस थांब्यावरून परत १ किलोमीटर अंतरावरील रेणुका नगर, लक्ष्मीनगर, दिलासा रुग्णालय, माउंट कारमेल, क. वर्ग तीर्थक्षेत्र संत गजानन महाराज मंदिर, स्वामी समर्थ केंद्र आदी महत्त्वपूर्ण ठिकाणे आहेत. अकोल्यावरून येणाऱ्या बस व मूर्तिजापूरकडून येणाऱ्या बस येथे थांबल्यास जनतेच्या हिताचे होईल. शिवाय परिवहन महामंडळाच्या आर्थिक तिजोरीत अधिक भर पडेल. दरम्यान, येथे थांबा द्यावा, अशी मागणी होत आहे.