अकोला: राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या मूल्यांकनासाठी शाळासिद्धी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. २0१८-१९ या वर्षासाठी शाळांचे स्वयंमूल्यमापन करण्यात येत आहे. आठवडाभरापूर्वी केवळ ९.१३ टक्केच शाळांनी स्वयंमूल्यमापन केले होते; परंतु या आठवड्यात अकोला जिल्ह्यातील शाळांनी गतीने स्वयंमूल्यमापन करीत ९४ टक्के काम पूर्ण केले आहे. १,८४१ शाळांपैकी १,६८७ शाळांनी स्वयंमूल्यांकन पूर्ण केले.शाळासिद्धी कार्यक्रमाच्या संकेतस्थळावर राज्यातील सर्व शाळांची माहिती भरून शाळा स्वयंमूल्यमापन करण्याचे निर्देश विद्या प्राधिकरणाकडून देण्यात आले होते. १00 टक्के शाळांचे स्वयंमूल्यमापन जानेवारी २0१९ अखेर पूर्ण करण्यास सांगितले होते. यासंदर्भात प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागानेसुद्धा शाळांना सूचना दिल्या होत्या; परंतु जानेवारी महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यातील ९ टक्केच शाळांनीच स्वयंमूल्यमापन पूर्ण केले होते. स्वयंमूल्यमापन करण्यात शाळा उदासिनता दाखवित असल्यामुळे जिल्हा शैक्षणिक व व्यावसायिक विकास संस्थेसह शिक्षण विभागाने शाळांना वारंवार सूचना देऊन स्वयंमूल्यमापन तातडीने पूर्ण करण्यास बजावले होते. त्यानंतर प्राचार्य डॉ. प्रकाश जाधव यांनी, शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठग, शाळा सिद्धीचे राज्य सुलभक प्रशांत शेवतकर, उमेश सरोदे,केंद्र प्रमुखांनी शाळांचा सातत्याने आढावा घेतला. त्यामुळे शाळांच्या स्वयंमूल्यमापनाला गती मिळाली. आठवड्याभरातच जिल्ह्यातील शाळांनी स्वयंमूल्यमापनाचे ८७. २४ टक्के लक्ष्य साध्य केले. जिल्ह्यातील १,८४१ शाळांपैकी १,६८७ स्वयंमूल्पमापन केले आहे. ६७ शाळांचे स्वयंमूल्यमापनाचे काम सुरू आहे तर ८७ शाळांमध्ये अद्यापही मूल्यमापनाचे काम सुरू करण्यात आलेले नाही. बाळापूर तालुक्यातील शाळांनी स्वयंमूल्पमापनाचे काम ९८.४६ टक्के पूर्ण केले आहे. त्यापाठोपाठ मूर्तिजापूर, बार्शीटाकळीचा क्रमांक लागतो. अकोला पंचायत समिती अंतर्गतच्या शाळा आणि तेल्हारा तालुक्यातील शाळांनी अनुक्रमे ८0.९0 टक्के आणि ७१.१८ टक्क्यांपर्यंत लक्ष्य गाठले आहे. (प्रतिनिधी)
शाळासिद्धी उपक्रमातर्गंत जिल्ह्यातील शाळांचे स्वयंमूल्यमापन करण्याचे काम वेगाने सुरू आहे. ९४ टक्के शाळांचे स्वयंमूल्यमापन झाले आहे. उर्वरित शाळासुद्धा मूल्यमापन पूर्ण करतील. त्यासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.-डॉ. प्रकाश जाधव, प्राचार्य,जिल्हा शैक्षणिक व व्यावसायिक विकास संस्था