अकोला जिल्ह्यात खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 10:24 AM2020-07-29T10:24:16+5:302020-07-29T10:25:00+5:30
नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लेखणीबंद आंदोलन केल्याने, मंगळवारी जिल्ह्यात मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : प्रलंबित मागण्यांसाठी नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लेखणीबंद आंदोलन केल्याने, मंगळवारी जिल्ह्यात मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प झाले.
नोंदणी मुद्रांक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे पदोन्नतीने भरण्यात यावी, कोरोना कालावधीत काम करणाºया अधिकारी व कर्मचाºयांना सुरक्षा विमा कवच लागू करण्यात यावे, निनावी तक्रारीसंदर्भात कार्यवाही करण्यात येऊ नये, यासह इतर मागण्यांसाठी नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी व कर्मचाºयांनी मंगळवार, २८ जुलै रोजी एक दिवसीय लेखणीबंद आंदोलन केले. प्रलंबित मागण्यांचे निवेदन अधिकारी व कर्मचाºयांच्यावतीने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी दिलीप भोसले यांना सादर करण्यात आले. यावेळी सह दुय्यम निबंधक एन.जी. एम्बडवार, बी.के. मेश्राम, एस.पी. चव्हाण, डी. बी. देशपांडे आदी अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. जिल्ह्यातील नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी व कर्मचाºयांनी लेखणीबंद आंदोलन केल्याने, जिल्ह्यात मंगळवारी मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहाराचे कामकाज ठप्प झाले होते.
नोंदणी-मुद्रांक शुल्कापोटी ७० लाखांचा बुडाला महसूल!
नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी व कर्मचाºयांनी लेखणी बंद आंदोलन केल्यामुळे मालमत्ता खरेदी व विक्री व्यवहारातून जिल्ह्यात दर दिवशी शासनाच्या तिजोरीत जमा होणारा ६० ते ७० लाख रुपयांचा महसूल मंगळवारी बुडाल्याचा अंदाज आहे.
नागरिकांना नाहक हेलपाटे!
जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये खरेदी-विक्री व्यवहाराचे कामकाज बंद राहिल्याने मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारासाठी आलेल्या नागरिकांना नाहक हेलपाटे सहन करावे लागले.