अकोला: सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे; मात्र दिवाळीची बाजारपेठ अन् असुरक्षीत प्रवासी वाहतूक कोरोनाला पुन्हा निमंत्रण देणारी ठरू शकते. या काळात नागरिकांकडून होणाऱ्या बेफिकिरीमुळे हा कोरोना रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत प्रतिबंधात्मक उपाययोजना हाच बचावाचा मार्ग ठरणार आहे. त्यामुळे नागरिकांनी बेफिकिरी न बाळगता घराबाहेर निघताना आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट झाली आहे. त्यामुळे अकाेलेकरांना मोठा दिलासा आहे; मात्र दिवाळीनिमित्त बाजारपेठेत होणारी गर्दी आणि प्रवासी वाहतुकीमुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापासून बाचावासाठी नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याची गरज आहे.
हे करा
- घराबाहेर निघताच मास्क लावा
- इतरांपासून सुरक्षीत अंतर ठेवा
- सोबत हॅन्ड सॅनिटायझर ठेवा
- नाका, तोंडाला हाताचा स्पर्श टाळा
- काही खाण्यापूर्वी साबणाने हात स्वच्छ धुवा
- व्हायरल फिव्हर म्हणून दुर्लक्ष करू नका
- सध्या वातावरणातील बदलांमुळे व्हायरल फिव्हरची साथ सुरू आहे. त्यामुळे व्हायरल फिव्हर म्हणून
- अनेकांचे कोरोनाकडे दुर्लक्ष होऊ शकते. अशा वेळी लक्षणे दिसताच डॉक्टरांच्या सल्ल्याने कोरोनाची चाचणी करून घ्यावी.
- या लक्षणांकडे विशेष लक्ष द्या सर्दी, ताप, कोरडा खोकला घशात खवखवणे जीभेची चव जाणे सुगंध किंवा दुर्गंध न येणे
दिवाळीच्या काळात होणारी गर्दी आणि त्यामध्ये बाळगण्यात येत असलेल्या बेफिकिरीमुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही; परंतु प्रतिबंधात्मक उपाय केल्यास रुग्णसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवणे आपल्या हातात आहे. त्यासाठी नागरिकांनी मास्क लावणे, नियमित हात धुणे व गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळल्यास रुग्णसंख्या वाढीला ब्रेक लावणे शक्य होणार आहे.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला