प्राणघातक हल्ला करून लुटमार करणाऱ्यास सात वर्षांची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 06:00 PM2019-12-20T18:00:19+5:302019-12-20T18:00:28+5:30
राष्ट्रपाल राजाराम वानखडे असे आरोपीचे नाव असून त्याला ५ हजार रुपये दंड ठोठावला असून दंड न भरल्यास आणखी शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले आहे.
अकोला - खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मरगट परिसरातून जात असलेल्या दोघांवर चाकूने हल्ला करून त्यांच्याकडील चार हजार ८०० रुपये पळविणाºया आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवीत सात वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा शुक्रवारी सुनावली. राष्ट्रपाल राजाराम वानखडे असे आरोपीचे नाव असून त्याला ५ हजार रुपये दंड ठोठावला असून दंड न भरल्यास आणखी शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले आहे.
खदान परिसरातील रहिवासी देवानंद लक्ष्मन गवई व त्यांचे मामा गौतम कंकाळ हे दोघे जन २६ एप्रिल २०१० रोजी मरगट रोडने जात असतांना महात्मा फुले नगरातील रहिवासी राष्ट्रपाल राजाराम वानखडे याने सदर दोघांना अडवून दारु पिण्यासाठी पैसे मागीतले. त्यांनी पैसे देण्यास नकार दिला असता वानखडे याने त्याच्या कमरेत लावलेला चाकू काढून तो देवानंद गवई यांच्या पोटात खुपसला, त्यानंतर गौतम कंकाळ यांनाही बेदम मारहाण केली. हे दोघेही जखमी झाल्यानंतर आरोपी राष्ट्रपाल वानखडे याने दोघांच्या खीशातील चार हजार ८०० रुपयांची रोकड घेउन पळ काढला. जखमी दोघांनी तातडीने खदान पोलिस ठाणे गाठून घडलेला प्रकार त्यांना सांगीतला. त्यानंतर खदान पोलिसांनी राष्ट्रपाल राजाराम वानखडे याच्याविरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ३०७ तसेच ३९४ नुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास पीएसआय पी. व्ही. लांडे यांनी केल्यानंतर दोषारोपपत्र जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. के. भालेराव यांच्या न्यायालयात सादर केले. न्यायालयाने ९ साक्षीदार तपासल्यानंतर साक्ष पुराव्यावरुन आरोपी राष्ट्रपाल राजाराम वानखडे याला दोषी ठरवीले. त्यानंतर कलम ३०७ अन्वये सात वर्षांची शिक्षा तसेच दोन हजार ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिन्यांचा अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच कलम ३९४ अन्वये सात वर्षांची शिक्षा तसेच दोन हजार ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिन्यांचा अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली.