प्रेमसंबंधातून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण
By admin | Published: August 4, 2016 01:40 AM2016-08-04T01:40:00+5:302016-08-04T01:40:00+5:30
आरोपीने जबरदस्तीने प्रस्थापित केले शारीरिक संबंध; मुलीला गर्भधारणा.
अकोला, दि.३- अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळय़ात ओढून तिला लग्नाचे आमिष दाखवून तिचे वर्षभरापासून जबरदस्तीने लैंगिक शोषण करणार्या युवकाविरुद्ध आकोट फैल पोलिसांनी बुधवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली.
आकोट फैल परिसरात राहणार्या एका १६ वर्षीय मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी आकाश सिद्धार्थ काटे (रा. इंदिरा नगर) याने तिला प्रेमाच्या जाळय़ात ओढले. सोबत जगण्या-मरण्याच्या आणाभाका घेतल्या. तिला लग्नाचे आमिष दाखविले आणि तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला; परंतु मुलीने त्याला नकार दिला. त्यानंतर आरोपीने आपण लग्न करणारच आहोत. संबंध प्रस्थापित करण्यास काय हरकत आहे, अशा शब्दात तिला समजाविले; परंतु मुलीने नकार दिला. आरोपी आकाश काटे याने तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि वेळोवेळी त्याने मुलीचे लैंगिक शोषण केले. यातून मुलीचा गर्भधारणा झाली. मुलीने त्याला लग्नाविषयी विचारले असता, तो टाळाटाळ करू लागला. पुढे पाहू, असे म्हणून लागला. मुलीने त्याला स्पष्ट शब्दात विचारणा केल्यावर आकाशने तो मी नव्हेच अशी भूमिका घेतली. मुलीला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तिने बुधवारी आकोट फैल पोलीस ठाण्यात कुटुंबासह धाव घेतली. पोलिसांकडे आपबिती कथन केली. पोलिसांनी तिच्या तक्रारीनुसार आरोपी आकाश काटे याच्याविरुद्ध भादंवि कलम ३७६ आणि बाल लैंगिक संरक्षण कायद्यानुसार (पॉस्को) गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, गुरुवारी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.