रायगडावर शिवराज्यभिषेक सोहळा; अकोल्यातील अडीचशे शिवभक्त जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 03:07 PM2019-06-01T15:07:57+5:302019-06-01T15:08:17+5:30
देशभरातील लाखो शिवभक्तांसोबतच अकोल्यातील अडीचशे शिवभक्त सहभागी होणार आहेत, अशी माहिती अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेतून देण्यात आली.
अकोला : अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दुर्गराज रायगडावर ५ व ६
जून २०१९ रोजी शिवराज्याभिषेक सोहळा होणार आहे. समितीचे मार्गदर्शक श्रीमंत युवराज संभाजी राजे छत्रपती व युवराज शहाजी राजे
छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा साजरा होत आहे. यंदा 'जागर शिवकालीन युद्धकलेचा' व 'सोहळा पालखीचा स्वराज्याच्या
ऐक्याचा' कार्यक्रम शिवराज्याभिषेक महोत्सवाचे आकर्षण बिंदू असणार आहेत. देशभरातील लाखो शिवभक्तांसोबतच अकोल्यातील अडीचशे शिवभक्त सहभागी होणार आहेत, अशी माहिती अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेतून देण्यात आली. यावेळी संभाजी ब्रिगेडचे पंकज जायले, पवन महल्ले, चेतन ढोरे, गोपीअण्णा चाकर, मंगेश काळे, चंद्रकांत झटाले, नितीन सपकाळ आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
युगपुरुष छत्रपती शिवरायांनी सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी लोकशाहीच्या तत्त्वावर स्वराज्याची उभारणी केली. अठरा अलुतेदार, बारा बलुतेदारांना सोबत घेऊन स्वराज्यात ऐक्य घडवले, शत्रूवर जरब बसवत रयतेला स्वाभिमानाने जगण्याचा मंत्र दिला. छत्रपती शिवरायांचा ६ जून १६७४ ला राज्याभिषेक झाला आणि स्वराज्याला छत्रपती मिळाले. महाराष्ट्रासह देशभरात ही घटना इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद घेणारी ठरली. हा दिवस म्हणजे खऱ्या अर्थाने भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन. तो 'राष्ट्रीय सण' म्हणून साजरा होण्यासाठी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती कार्यरत आहे. राज्याभिषेकाच्या स्मृती चिरंतन राहाव्यात, यासाठी समितीतर्फे दरवर्षी दुर्गराज रायगडावर राज्याभिषेकाचा सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. यंदाही हा सोहळा ५ व ६ जूनला विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे.
छत्रपती शिवराय व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे वारसदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे किल्ले रायगडावर हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होतो. देशभरातून इतिहास संशोधक, अभ्यासक, शिवभक्त, इतिहासप्रेमी या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. यंदा गडावर ५ जूनला सायंकाळी पाच वाजता 'जागर शिवकालीन युद्धकलेचा' हा मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम होणार आहे. महाराष्ट्रातील युद्धकला आखाड्यांचा यात सहभाग असणार आहे. महाराष्ट्राची पारंपरिक युद्धकला कशी असते, याचे दर्शन गडावर येणाºया तमाम देशवासीयांना व्हावे, हा त्यामागचा उद्देश आहे. पट्टा, तलवार, भाला, जंबिया, कट्यार, माडू, फरी गलका यांच्यासह लाठीच्या विविध प्रकारांचे सादरीकरण होणार आहे. त्याचबरोबर ६ जूनला मेघडंबरीतील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला सुवर्ण नाण्यांचा अभिषेक झाल्यानंतर 'सोहळा पालखीचा स्वराज्याच्या ऐक्याचा' या पालखी मिरवणुकीत महाराष्ट्रातील बारा बलुतेदार, अठरा अलुतेदारांसह सर्व धर्मातील लोक सहभागी होणार आहेत. आपापल्या पारंपरिक लोककलांचा मिरवणुकीत जागर घालणार आहेत. राजसदर, नगारखाना, होळीचा माळ, बाजारपेठ ते जगदीश्वर मंदिर असा पालखी सोहळ्याचा मार्ग असेल. या मार्गावरून पालखीवर पुष्पवृष्टी केली जाणार आहे. सर्व शिवभक्तांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.