चिखलदरा, दि. 19 - मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून अकोला जिल्ह्याच्या अकोट व तेल्हारा तालुक्यात पुनर्वसित झालेल्या आठ गावांत सुविधांअभावी मृत्यूचे तांडव सुरू असताना प्रशासन मात्र अनभिज्ञ असल्याचे चित्र आहे. २२८ जणांचा मृत्यू झाल्याने आदिवासी संतापले असून बुधवारी त्यांनी पुन्हा मेळघाटात परत जाण्याचा निश्चय केला आहे. चिखलदरा तालुक्यातील केलपाणी, गुल्लरघाट, सोमठाणा खुर्द, सोमठाणा बु., अमोना, धारगड या सहा गावांचे अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात, तर नगरतास व बारुखेडा या दोन गावांचे तेल्हारा तालुक्यात सन २०११ ते २०१५ यादरम्यान टप्प्याटप्प्याने पुनर्वसन करण्यात आले. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित क्षेत्रात वसलेल्या एकूण १४ गावांचे पुनर्वसन शासनाने केले असले तरी या आठ गावांमध्ये मूलभूत सोयी सुविधांअभावी त्यांना पुनर्वसनाच्या नावाखाली मरणयातना भोगाव्या लागत आहेत. मेळघाटच्या निसर्गरम्य वातावरणात राहणा-या आदिवासींना जंगलाबाहेर काढताच त्यांना विविध आजाराने ग्रासले. पैशाची चणचण, पुनर्वसित गावांत कुठल्याच आरोग्य सुविधा नसल्याने आबालवृद्ध अशा २२८ जणांचा चार वर्षांत तडफडून मृत्यू झाल्याचे सत्य बाहेर आले आहे. मृतांमध्ये युवकांची संख्या अधिकगत चार वर्षांत मृतांमध्ये युवकांची संख्या सर्वाधिक असल्याचे उघडकीस आले आहे. त्यानुसार अमोना येथे नऊ मृत्यूपैकी दोन युवक, गुल्लरघाट १२ मृत्यूमध्ये सहा युवक, धारगड ४२ मृत्यूपैकी २० युवक, सोमठाणा खुर्द १० पैकी तीन युवक, केलापाणी १२ पैकी नऊ युवक, नगरतास १३ पैकी ९ युवक, बारूखेडा ६६ पैकी २५ युवक, सोमठाणा ६४ पैकी ३० युवक असे एकूण आठ गावांत २२८ मृत्यूसंख्येत ३० ते ३५ वयोगटातील १०४ युवकांचा समावेश आहे. एकाच घरातील सहा मृत्यूबारूखेडा येथील रामकली, बुडा बेठेकर या साठीतील म्हातारीने अगोदर अश्रूला वाट मोकळी केली आणि पुनर्वसनानंतर अधिका-यांची इंग्रजाप्रमाणे वागणुकीचा पाढा वाचत पाच वर्षांत पती, दोन मुलं आणि तीन नातवंड अशा सहा जणांचा मृत्यू उपचाराअभावी झाल्याचे सांगितले. सोमठाणा बु. येथील एकाच वेळी घरातील चौघांना पुनर्वसनाचे पैसे न मिळाल्याने मृत्यूला कवटाळावे लागले. रतीराम गंगाराम जावरकर (४२) यांना आजारी असल्याने अकोला येथे उपचारासाठी नेले. त्यांचा भाऊ राजकुमार व्याघ्र अधिकाºयांकडे पुनर्वसनाचा बाँड तोडून पैसे मागायला गेला. त्याला हाकलून लावले. परिणामी रतिरामने मृत्यूला कवटाळले. त्याचा धसका घेत राजकुमार, रतिरामची पत्नी रखमा जावरकर व आई गंगा जावरकर अशा चौघांचा मृत्यू झाला. पुनर्वसित आठ गावांतील आदिवासींसोबत केलपाणी येथे बुधवारी बैठक झाली. त्यांच्या अनेक समस्या ऐकून घेतल्या. प्रशासनाला दोन महिन्यांचा वेळ देऊ, अन्यथा आपला मेळघाटातील हिसका दाखवू.- राजकुमार पटेल, माजी आमदारआठ गावांतील आम्हा आदिवासींची फसवणूक करून पुनर्वसन केले. २२८ जणांचा मृत्यू झाला. पण उपचार दिले नाहीत. आरोग्य केंद्र नाही. कुठल्याच सुविधा नाही. त्यामुळे आम्ही आता पुन्हा मेळघाटात जाण्याचा संकल्प केला. - विष्णू राऊत, गुल्लरघाट
धक्कादायक ! अकोला जिल्ह्यात पुनर्वसित आठ गावातील २२८ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2017 6:03 PM