खेट्री : चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत सुकळी शेत शिवारात किरकोळ वादातून एका ५५ वर्षीय इसमावर दोघांनी कुºहाडी वार करून जखमी केले आणि नंतर त्याच्या शरीरावर गावठी दारू ओतून त्याला पेटवून दिले. त्यानंतर आरोपींनी या इसमाचा मृतदेह जवळील नाल्याच्या काठावर फेकून दिला. ही घटना १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करून एकास अटक केली.राजाराम तुकाराम हिवराळे (५५) असे मृतकाचे नाव आहे. आरोपी विकास बाबूसिंग राठोड व मृतक राजाराम हिवराळे हे एका शेतात मजुरी करीत होते. रविवारी सायंकाळी आरोपी विकास राठोड व राजाराम हिवराळे यांच्यात वाद झाला. वाद विकोपाला गेल्यामुळे आरोपी विकास राठोड याने राजाराम हिवराळे यांच्यावर कुºहाडीने हल्ला केला. त्यांना जखमी केल्यानंतर त्याने त्यांच्या अंगावर गावठी दारू ओतून त्यांना पेटवून दिले. नंतर त्यांचा मृतदेह जवळील नाल्याच्या काठावर फेकून दिला. घटनेची माहिती मिळताच चान्नी पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार सचिन यादव यांच्या मार्गदर्शनात आदिनाथ गाठेकर, पद्माकर पातोंड, किरण गवई, रावसाहेब बुधवंत, सुधाकर करवते, खत्री, संतोष जाधव, यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून गंभीर झालेल्या राजाराम हिवराळे यांना रुग्णवाहिकेद्वारे अकोला येथे उपचारासाठी पाठविले; परंतु रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आरोपीस अटक केली. रात्री उशिरापर्यंत आरोपी विकास राठोड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पुढील तपास चान्नी पोलीस करीत आहेत. आरोपी गुंड प्रवृत्तीचाहत्या करणारा आरोपी विकास राठोड हा गुंड प्रवृत्तीचा आहे. त्याने अनेकांसोबत वाद घालून प्राणघातक हल्ले केले आहेत. त्याच्याविरुद्ध चान्नी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याच्यावर कठोर कारवाई करून तडीपार करण्याचा प्रस्ताव पोलिसांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे पाठवावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.