- संजय खांडेकरअकोला : शॉप अॅक्ट परवान्याच्या नावाखाली अकोलेकरांची सर्रास लूट सुरू असून, २३ रुपयांच्या नाममात्र नोंदणी शुल्क परवान्यासाठी चक्क १५०० रुपये घेतल्या जात आहेत. याप्रकरणी अकोल्यातील इन्कम टॅक्स चौकातील शॉप अॅक्ट कार्यालयात तक्रारी येत असल्या, तरी त्याकडे लक्ष देण्यास कुणी अधिकारी नाही.कोणताही व्यवसाय करताना शॉप अॅक्ट परवाना काढणे गरजेचे असते. चालू बँक खात्यासाठी हा नियम लागू आहे. शॉप अॅक्ट परवाना मिळण्याची पद्धत अधिक सोपी आणि सरळ व्हावी म्हणून शासनाने अर्ज करणे आणि परवाना देण्याची प्रक्रिया आॅनलाइन केली आहे. दहा कर्मचाऱ्यांच्यावर संख्या असलेल्या दुकानदारांना शॉप अॅक्ट परवाना आणि त्याचे नियमित शुल्क भरणे गरजेचे आहे; मात्र इतर खुद्द मालक-खुद्द चालक असलेल्या दुकानदारांना केवळ शॉप अॅक्ट परवानाची नाममात्र नोंदणी करावी लागते. आॅनलाइन नोंदणी एकाच वेळी करावी लागते. यासाठी केवळ २३ रुपये शुल्क आकारले जाते; मात्र काही नेट कॅफेचे संचालक, सर्व्हिस सेंटरचे संचालक आणि एजंट या परवान्यासाठी ५०० रुपयांपासून तर १५०० रुपये घेत आहेत. वास्तविक पाहता २३ रुपयांमध्येच सर्व्हिस सेंटरचे शुल्कही आकारलेले आहे; मात्र याबाबत कुणी फारशी चौकशी करीत नाही. जर शासनाचे शुल्क २३ रुपये आणि संगणकीय खर्च शंभर गृहीत धरले तरी दीडशे रुपयांच्यावर कुणी घ्यायला नको; मात्र शॉप अॅक्ट परवान्यासाठी सर्रास लूट सुरू आहे. ज्याला वाटेल ते त्याच्या पद्धतीने लूट करीत आहेत. अव्वाच्या सव्वा रुपये घेणाºयांवर कारवाईची गरज आहे. ही लूट केवळ अकोल्यात नाही, तर सर्वत्र असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. अकोल्यात जेवढे सायबर कॅफेचे संचालक आहेत आणि सर्व्हिस सेंटरचे संचालक आहेत, त्यांना नोटीस बजावून यंत्रणेने विचारणा करण्याची गरज आहे. यासंदर्भात कार्यालयातील शॉप अॅक्ट निरीक्षकांना प्रत्यक्ष भेटण्याचा प्रयत्न केला. त्यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधला; मात्र प्रतिसाद मिळाला नाही.