अकाेला: जिल्ह्यासह शहरात जिल्हा प्रशासनाने ५ एप्रिल पासून लाॅकडाऊन घाेषित केले असून जीवनावश्यक वस्तूंची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त इतर काेणत्याही व्यावसायिकांनी तसेच अकाेलेकरांनी लाॅकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाइ करण्याचा महापालिकेने दिलेला इशारा व्यावसायिकांनी बासनात गुंडाळून ठेवल्याचे शुक्रवारी दिसून आले. नेकलेस राेड, गांधी राेड, टिळक राेड, न्यु कापड बाजार,काला चबुतरा तसेच सिंधी कॅम्प परिसरातील बहुतांश व्यावसायिकांनी दुकाने खुली केल्याचे चित्र हाेते. यादरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या केवळ १४ व्यावसायिकांना मनपाच्या पथकाने दंड आकारला. कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाच्या वतीने ५ एप्रिलपासून लाॅकडाऊन घोषित करण्यात आले. मनपा क्षेत्रामध्ये सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तू जसे हॉस्पीटल, क्लिनिक्स, मेडीकल इंशुरंस कार्यालये, औषध विक्रेते, ईतर वैद्यकीय आरोग्य सेवेशी संबंधीत घटक व पशुवैद्यकीय सेवा, किराणा दुकान, भाज्यांचे दुकाने, फळ दुकाने, डेअरी, बेकरी, मिठाई दुकाने सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. तसेच सर्व रेस्टारंट, हॉटेल्स, उपहारगृह मालकांना फक्त पार्सल सुविधेची आणि होम डिलिव्हरीची मुभा देण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकाना व्यतिरिक्त इतर कोणतीही दुकाने, प्रतिष्ठाने सुरू ठेवल्यास संबंधितांवर पहिल्यांदा 1 हजार रूपयांची दंडात्मक कारवाई करण्यात येईल. दुसऱ्यांदा आढळल्यास संबंधित दुकानाला तीन दिवसांसाठी सील लावण्याची कारवाई करण्यात येणार आहे. याचसोबत रस्त्यावर किंवा दुकानातून जीवनावश्यक सामग्री खरेदी करताना सोशल डिस्टसींग नियमाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना तसेच शहरामध्ये विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांना 500 रुपये दंड आकारण्याचा इशारा महापालिका प्रशासनाने दिला हाेता. हा इशारा बासनात गुंडाळून ठेवत नेकलेस राेड,गांधी राेडसह शहराच्या विविध भागातील व्यावसायिकांनी दुकाने खुली केल्याचे चित्र दिसून आले.
पथकांची कारवाई संशयाच्या घेऱ्यात
नेकलेस राेडवरील काही दुकाने दिवसभर खुली हाेती. त्यांच्याविराेधात मनपाच्या पथकांनी काेणतीही कारवाई न केल्यामुळे इतर व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली. याप्रकाराची मनपा आयुक्त निमा अराेरा दखल घेतील का,असा प्रश्न निर्माण झाला आहे.