महावितरणच्या ‘पेमेंट वॉलेट’ला अल्प प्रतिसाद
By atul.jaiswal | Published: August 28, 2019 02:34 PM2019-08-28T14:34:44+5:302019-08-28T14:35:29+5:30
अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यातून २७ आॅगस्टपर्यंत केवळ १९१ जणांनी अर्ज केले आहे.
- अतुल जयस्वाल
अकोला: ग्राहकांच्या सुविधेसाठी वेगवेगळ्या सोयीसुविधा आॅनलाइन देण्यात अग्रेसर असलेल्या महावितरणच्या ‘पेमेंट वॉलेट’ला पश्चिम वºहाडातील तीन जिल्ह्यात मात्र अल्प प्रतिसाद मिळत आहे. ११ जुलै रोजी ‘लाँच’ झालेल्या या सुविधेसाठी महावितरणच्याअकोला परिमंडळातील अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यातून २७ आॅगस्टपर्यंत केवळ १९१ जणांनी अर्ज केले आहे. विशेष म्हणजे या दीड महिन्यांच्या कालावधीत महावितरण मुख्यालयाकडून फक्त एका अर्जाला मंजुरी मिळाली आहे.
महावितरणने अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार मार्गदर्शनाखाली स्वत:चे पेमेंट वॉलेट आणले आहे. आवश्यक अटींची पूर्तता करणाऱ्या १८ वर्षांवरील कोणत्याही व्यक्तीला वॉलेटधारक होता येते. यातून वीज ग्राहकांना विशेषत: ग्रामीण भागात वीज बिलाचा भरणा करणे सुलभ होण्यासह प्रती बिल पावतीमागे ५ रुपये उत्पन्न मिळविण्याची संधी वॉलेटधारकास उपलब्ध करून दिली आहे. या संधीचा फायदा घेण्यासाठी महावितरणच्या अकोला परिमंडळातील अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील १९१ वीज ग्राहकांनी अर्ज केले आहेत. यापैकी केवळ एक अर्ज महावितरण मुख्यालयाकडून मंजूर झाला आहे. उर्वरित अर्ज विविध कारणास्तव एकतर फेटाळण्यात आले आहेत किंवा प्रलंबित असल्याचे महावितरणमधील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.
१९ अर्ज फेटाळले
तीन जिल्ह्यातून करण्यात आलेल्या १९१ अर्जांपैकी १९ अर्ज फेटाळण्यात आले आहेत. यामध्ये अकोल्यातील ५, वाशिममधील २, तर बुलडाण्यातील १२ अर्जांचा समावेश आहे. यापैकी ८ अर्ज मुख्यालयातून बाद झाले, तर ११ अर्ज उपविभागस्तरावर फेटाळण्यात आले.
असे आहेत जिल्हानिहाय अर्ज
जिल्हा अर्ज
अकोला ६३
वाशिम २६
बुलडाणा १०२
----------------------------------------
एकूण १९१