आकोट : जयभोलेचा गजर करीत शिवभक्तांनी गुफेमध्ये जाण्यापुर्वी धारगड येथे उंचावरुन पडणार्या पाण्याच्या धारेत स्नानकरीत भक्तीमय वातावरणात शिवलिंगाचे दर्शन घेतले. यावेळी हर्र ऽ ऽ बोला महादेवाच्या गजराने श्रीक्षेत्र धारगड परिसर दुमदुमला होता. गतवर्षी पेक्षा यावर्षी शिवभक्तांची संख्या रोडवली असली तरी मात्र महीलांची गर्दी लक्षणीय होती. सातपुड्याच्या कुशीत असलेल्या श्रीक्षेत्र धारगड येथे श्रावणाच्या तिसर्या सोमवारी १0 व ११ ऑगस्टला यात्रा महोत्सव पार पडला. शिवभक्तांनी पूर्णा नदिवर जाऊन कावडीव्दारे जल आणले, तेथून पायदळ महादेवाचा गजर करीत डफाच्या तालावर श्रीक्षेत्र धारगड येथे पोहचून जलाभिषेक केला. या यात्रेमध्ये अकोला जिल्ह्यातील नव्हे तर आजूबाजूच्या अमरावती, वाशीम, बुलडाणा आदी जिल्ह्यातून शिवभक्तांनी हजेरी लावली होती. आकोट शहरात शिवभक्तांची रेलचेल दिसून आली. शिवभक्तांकरिता बसस्थानक मार्गावर ठिकठिकाणी स्वयंसेवी संस्थांनी अल्पदरात चहापान, फराळाची व्यवस्था केली होती. आकोट आगारातून धारगड येथे जाण्याकरिता ज्यादा बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. बसेसव्दारे शिवभक्त अमोना पर्यंत पोहचले. तर काही खासगी वाहनांव्दारे पोपटखेड मार्गाने धारगडावर पोहचले. मंदिर परिसरात विविध संघटनांतर्फे महाप्रसादाची, फराळाची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. धारगड सेवा समितीचे कार्यकर्ते भाविकांच्या सेवेत दिसून आले. मंदिर परिसरात पुजेचे साहित्य, प्रसादाची दुकाने थाटण्यात आली होती. धारगड दर्शन घेऊन परतीच्या मार्गावर नरनाळा किल्ल्यावर हनुमान गढ सेवा समितीच्या महाप्रसादाचा लाभ शिवभक्तांनी घेतला. पोपटखेड मार्गे जातांना व येतांना नागोबा मंदिर येथे सराफ बाजार आकोट तर्फे आयोजित फराळ लाभ घेतला. धारगडावर अमोना मार्गे पायी जाणार्या भक्तांची अमोना येथे तपासणी करण्यात आली. पोपटखेड मार्गावर जाणार्या वाहनांचीसुद्धा वनविभागाच्या नाक्यावर, खटकाली टी पॉईंट आदी ठिकाणी तपासणी करण्यात आली. यावेळी अनेकांकडील मद्य, गुटखा पुड्या, माचीस, प्लॉस्टिक पिशव्या आदी जप्त करण्यात आल्या. यात्रेकरीता वन्यजीव व पोलीस,महसुल विभागाने यात्रा सुरळीत पार पाडली.
श्रीक्षेत्र धारगड येथे शिवभक्तांनी केला महादेवाला जलाभिषेक
By admin | Published: August 12, 2014 12:54 AM