साध्या पद्धतीने लग्न; दुचाकीवरून पाठवणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 10:55 AM2020-04-18T10:55:22+5:302020-04-18T10:55:47+5:30
वाहनांना बंदी असल्याने नवरदेवाच्या दुचाकीने नवरी सासरी गेली.
- संतोष गव्हाळे
लोकमत न्यूज नेटवर्क
हातरूण : कोरोनाच्या हाहाकारामुळे उन्हाळ्यात लग्नसराईच्या कालावधीमध्ये ‘लॉकडाउन’ झाल्याने नियोजित विवाह सोहळे रद्द करून विवाहाच्या तारखांमध्ये बदल करण्यात येत आहे. विवाह सोहळ्यातील गर्दी टाळण्यासाठी आदर्श विवाह पार पडत आहेत. शिंगोली येथे सात ते आठ नागरिकांच्या उपस्थित सध्या पद्धतीने विवाह पार पडला. तसेच नवरदेव नवरीला नातेवाइकांनी मोबाइलवरून आॅनलाइन सहभागी होत शुभेच्छा दिल्या. वाहनांना बंदी असल्याने नवरदेवाच्या दुचाकीने नवरी सासरी गेली.
‘लॉकडाउन’च्या काळात सात ते आठ लोकांच्या उपस्थितीत शिंगोली गावात ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळत आदर्श विवाह गुरुवारी सकाळी पार पडला. नववधू नवरदेवासह दुचाकीवर सासरी रवाना झाली. तेल्हारा तालुक्यातील पिवंदळ येथील नवरदेव रूपेश ज्ञानदेव राऊत आणि बाळापूर तालुक्यातील शिंगोली येथील मीना शंकर बोर्डे या दोघांचा विवाह सोहळा साध्या पद्धतीने ‘सोशल डिस्टन्सिंग’ ठेवून पार पडला. नवरदेव आणि नवरीसह उपस्थित असलेल्या आठ ते दहा लोकांनी मास्क व सॅनिटायझरचा वापरसुद्धा यावेळी केला. विशेष म्हणजे, या लग्नात नातेवाइकांनी आॅनलाइन मोबाइलवरून सहभागी होत अक्षता टाकत वधू-वरांना शुभेच्छा दिल्या.
जमावबंदी असल्याने सगळे रीतिरिवाज बाजूला ठेवून अगदी साध्या पद्धतीने दहा लोकांच्या उपस्थितीत शिंगोली येथे आदर्श विवाह संपन्न झाला. विवाहासाठी नवरदेव दुचाकीवरून वधूच्या घरी दाखल झाला होता. या विवाह सोहळ्याला शिंगोली गावचे सरपंच महेश बोर्डे, शंकर बोर्डे, शेषराव बोर्डे, श्रीकांत ताथोड यांच्यासह सात ते आठ नागरिक उपस्थित होते.