सहा आठवड्यांच्या बालकांना आज लागणार ‘न्युमोकॉकल’लसीचा पहिला डोस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:13 AM2021-07-12T04:13:32+5:302021-07-12T04:13:32+5:30
न्युमोकॉकल ही लस बालकांना तीन टप्प्यात दिली जाणार आहे. सार्वत्रिक लसीकरण मोहिमेंतर्गत या लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यास सोमवारपासून सुरुवात होणार ...
न्युमोकॉकल ही लस बालकांना तीन टप्प्यात दिली जाणार आहे. सार्वत्रिक लसीकरण मोहिमेंतर्गत या लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यास सोमवारपासून सुरुवात होणार आहे. पोलिओप्रमाणेच ही मोहीम जिल्ह्यातील सर्वच लसीकरण केंद्रांवर राबविण्यात येणार असल्याची माहिती आहे. पहिल्या टप्प्यात सहा आठवड्यांच्या म्हणजेच दीड महिन्यांच्या बालकांना न्युमोकॉकल लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे. ही लस लहान मुलांना बॅक्टेरियल न्युमोनियापासून संरक्षण देणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
जिल्ह्यासाठी १६०० डोस प्राप्त
लहान मुलांच्या लसीकरण मोहिमेंतर्गत आरोग्य विभागाच्या अकोलामंडळासाठी पंधरा दिवसांपूर्वीच ‘न्युमोकॉकल’ लसीचे १२ हजार ६०० डोस प्राप्त झाले आहेत. यापैकी १६०० डोस हे अकोला जिल्ह्यासाठी असल्याची माहिती आहे.
असे राहणार लसीकरणाचे तीन टप्पे
पहिला डोस - ६ आठवड्याच्या बालकांना (दीड महिने)
दुसरा डोस - १४ आठवड्यांच्या बालकांना (साडेतीन महिने)
तिसरा डोस - ९ महिन्यांच्या बालकांना (९ महिने)
या ठिकाणी होणार लसीकरण
नागरी आरोग्य केंद्र
अंगणवाडी
प्राथमिक आरोग्य केंद्र
आरोग्य उपकेंद्र
जिल्हा स्त्री रुग्णालय
ग्रामीण रुग्णालय
पालकांनी घ्यावी ही खबरदारी
लसीकरणानंतर, जर बाळाला काही प्रतिकुल प्रतिक्रिया झाल्यास, एएनएम आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचित करावे.
बाळाला जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा जिल्हा रुग्णालयात न्यावे.
लहान मुलांमध्ये बॅक्टेरियल न्युमोनियाचा धोका असतो. हा धोका टाळण्यासाठी लहान मुलांच्या न्युमोकॉकल लसीचा पहिला डोस सोमवारी दिला जाणार आहे. त्यासाठी अकोला जिल्ह्यासाठी ‘न्युमोकॉकल’ लसीचे १६०० डोस प्राप्त झाले आहेत.
- डॉ. मनीष शर्मा, जिल्हा समन्वयक, लसीकरण, अकोला