स्निफर डॉग ‘लुसी’ने लावला गांजा विक्रेत्याचा छडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 11:01 AM2021-05-25T11:01:56+5:302021-05-25T11:08:25+5:30
Crime News : स्थानिक गुन्हे शाखेने दीपक पराते याच्याविरुद्ध जुने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी हरिहरपेठ स्थित गाडगेनगर येथील रहिवासी दीपक भगवान पराते (३९) याच्या घराची झडती घेतली. यावेळी स्निफर डॉग ‘लुसी’ने आरोपीच्या घरातून ६४० ग्रॅम गांजा शोधून काढला. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने दीपक पराते याच्याविरुद्ध जुने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याविषयी प्राप्त माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पद्मणे व त्यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे सोमवारी हरिहरपेठ स्थित गाडगेनगर येथील रहिवासी दीपक भगवान पराते याच्या घराची झडती घेतली. या कारवाई दरम्यान पाेलिसांनी सोबत स्निफर डॉग लुसीलाही नेले होते. यावेळी स्निफर डॉगने दीपकच्या घरात लपवून ठेवलेल्या गांज्याचा छडा लावला. पोलिसांनी तपासणी केली असता, मिळालेला गांजा हा ६४० ग्रॅम असून, त्याची किंमत ३,८०० रुपये इतकी आहे. पोलिसांनी हा गांजा जप्त करून दीपक पराते याच्याविरुद्ध जुने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पद्मणे, दशरथ बोरकर, गोकुळ चव्हाण, स्वप्नील खेडकर, स्वप्ना काशिद तसेच जिल्हा पोलीस दलातील श्वान पथकाचे पोलीस उपनिरीक्षक महेंद्र मडावी, स्निफर डॉक लुसी व हॅण्डलर गोपाल चव्हाण यांनी केली.