...तर तुम्हालाही असू शकतो स्किझोफ्रेनिया!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2022 12:09 PM2022-05-24T12:09:58+5:302022-05-24T12:10:20+5:30

so you may have schizophrenia too : एखाद्या गोष्टीचा मानसिक धक्का बसलेल्या व्यक्तींमध्ये या आजाराचा धोका जास्त असतो.

... so you may have schizophrenia too! | ...तर तुम्हालाही असू शकतो स्किझोफ्रेनिया!

...तर तुम्हालाही असू शकतो स्किझोफ्रेनिया!

googlenewsNext

अकोला: कुणी आपल्याविषयी चर्चा करत असल्याचा भास असो वा, एकटे असताना एखाद्या आवाजाचा भास होत असेल किंवा रागात अचानक जास्त आक्रमक होत असाल, तर तुम्हालाही स्किझोफ्रेनिया हा मानसिक आजार असू शकतो. मानसोपचार तज्ज्ञांच्या मते एखाद्या गोष्टीचा मानसिक धक्का बसलेल्या व्यक्तींमध्ये या आजाराचा धोका जास्त असतो. तुम्हालाही अशी लक्षणं असतील, तर तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन जागतिक स्किझोफ्रेनिया दिनानिमित्त डॉक्टर करतात.

स्किझोफ्रेनिया हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे. अनुवांशिकता किंवा शरीरातील रसायन बदलामुळे हा आजार उद्भवतो. रॅगिंग, कुणी छेड काढली असेल, किंवा शारीरिक वा मानसिक छळ, अशा घटनांमुळे अनेकांना मानसिक आघात बसतो. अशाच आघातातून अनेकांना स्किझोफ्रेनिया या आजाराला सामोरे जावे लागत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. साधारणत: १८ ते २५ वर्षे वयोगटातील तरुणांमध्ये या आजाराच्या रुग्णांचे प्रमाण जास्त आढळत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. लहान मुलांसोबतच वयोवृद्धांमध्येही या आजाराची लक्षणे दिसून येतात. त्यामुळे लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचारास सुरुवात करण्याचे आवाहन डॉक्टर करतात.

 

ही आहेत सकारात्मक लक्षणे

भास होणे (एकटे असतानाही आवाज झाल्याचा भास होणे.)

कुणी आपल्याविषयी चर्चा करत असल्याचा भास होणे.

लवकर राग येणे. रागाच्या भरात समोरच्या व्यक्तीवर आक्रमक होणे.

काही दिवसांपर्यंत आंघोळ न करणे, मध्यरात्री उठून जेवण करणे,

झोप कमी किंवा जास्त येणे.

स्वत:ची बौद्धिक क्षमता कमी होते.

नकारात्मक लक्षणे

रुग्ण आय टू आय कॉन्टॅक्ट करत नाहीत.

चेहऱ्याचे हावभाव बदलत नाहीत. (भावनाशून्य)

आवडीच्या गोष्टीतून रस निघून जाणे.

बोलणे कमी होणे किंवा कमी शब्दात बोलणे.

एकाग्रता कमी होणे.

 

काय आहेत उपचार?

एखाद्या व्यक्तीला सहा महिन्यांपर्यंत ही लक्षणे असतील, तर त्या व्यक्तीला स्किझोफ्रेनिया आजार असल्याचे निष्पन्न होते.

त्यानुसार, रुग्णावर दोन प्रकारे उपचार केले जातात.

साधारणत: पाच वर्षांपर्यंत रुग्णांवर उपचार केले जातात. यापूर्वी केवळ दोन वर्षांसाठी रुग्णांवर उपचार केले जात होते.

उपचारातून रुग्ण पुर्णत: बरा होऊ शकतो, मात्र काही रुग्णांमध्ये लक्षणे पुन्हा दिसून येतात.

 

रुग्णाला एक हजार रुपयांची मदत

 

युडीआयडी मार्फत नोंदणी केल्यानंतर रुग्णांना वैद्यकीय प्रमाणपत्र दिले जाते.

 

रुग्णाला पाच वर्षांसाठीचे वैद्यकीय प्रमाणपत्र दिले जाते.

 

त्यानुसार रुग्णाला महिन्याला एक हजार रुपयांची मदत दिली जाते.

 

यासाठी जीएमसी आणि मूर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयात रुग्णाला नोंदणी करता येते.

 

अनुवांशिकता किंवा शरीरात झालेल्या रासायनिक बदलांमुळे स्किझोफ्रेनिया आजार उद्भवू शकतो. याची लक्षणे साधारणत: सहा महिने आढळल्यास संबंधित व्यक्तीला हा आजार झाल्याचे निष्पन्न होते. औषधोपचारासोबतच रुग्णांना कौटुंबिक आधाराची देखील गरज असते. शंभरातील एका व्यक्तीला हा आजार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लक्षणे आढळताच डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार सुरू करणे गरजेचे आहे.

- डॉ. हर्षल चांडक, मानसोपचार तज्ज्ञ, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, अकोला

Web Title: ... so you may have schizophrenia too!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.