‘नरेगा’ कामांचे ‘सोशल आॅडिट’ सुरू; पण ‘रेकॉर्ड’ मिळेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 02:20 PM2019-08-30T14:20:35+5:302019-08-30T14:20:46+5:30
ग्रामसेवक संपावर असल्याने ग्रामपंचायतींकडून कामांचे ‘रेकॉर्ड’ उपलब्ध होत नसल्याने, ‘सोशल आॅडिट’मध्ये अडथळा निर्माण झाला आहे.
- संतोष येलकर
अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (नरेगा) जिल्ह्यातील अकोला, पातूर व मूर्तिजापूर या तीन तालुक्यांत २०१८-१९ या वर्षात विविध यंत्रणांमार्फत करण्यात आलेल्या कामांचे सामाजिक अंकेक्षण (सोशल आॅडिट) २८ आॅगस्टपासून सुरू करण्यात आले; मात्र ग्रामसेवक संपावर असल्याने ग्रामपंचायतींकडून कामांचे ‘रेकॉर्ड’ उपलब्ध होत नसल्याने, ‘सोशल आॅडिट’मध्ये अडथळा निर्माण झाला आहे.
शासनाच्या ग्रामविकास विभाग व सामाजिक अंकेक्षण संचालनालयाच्या आदेशानुसार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (नरेगा) जिल्ह्यातील कामांचे ‘सोशल आॅडिट’ करण्यात येत आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील अकोला, पातूर व मूर्तिजापूर या तीन तालुक्यांत २०१८-१९ या वर्षांत विविध यंत्रणांमार्फत करण्यात आलेल्या ‘नरेगा’ कामांचे ‘सोशल आॅडिट’ २८ आॅगस्टपासून सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये तीनही तालुक्यांत ग्रामपंचायतनिहाय यंत्रणांमार्फत करण्यात आलेल्या ‘नरेगा’ कामांची पाहणी ग्राम साधन व्यक्तींच्या पथकांमार्फत करण्यात येत आहे. तसेच करण्यात आलेल्या कामानुसार ग्रामपंचायतींकडे ‘रेकॉर्ड’ उपलब्ध आहे की नाही, यासंदर्भात तपासणी करण्यात येत आहे; परंतु ग्रामसेवकांचा संप सुरू असल्याने ग्रामपंचायतींकडून कामांचे ‘रेकॉर्ड’ उपलब्ध होत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अकोला, पातूर व मूर्तिजापूर या तीन तालुक्यांतील १२० ग्रामपंचायती अंतर्गत ‘नरेगा’ कामांचे ‘सोशल आॅडिट’ सुरू करण्यात आले असले तरी, ग्रामसेवक संपावर असल्याने ग्रामपंचायतींकडून कामांचे ‘रेकॉर्ड’ मिळत नसल्याने, सोशल आॅडिटमध्ये कामांच्या रेकॉर्ड तपासणीत अडथळा निर्माण झाला आहे.
१२० ग्रामपंचायती अंतर्गत कामांचे ‘सोशल आॅडिट’ सुरू!
जिल्ह्यातील अकोला, पातूर व मूर्तिजापूर या तीन तालुक्यांत प्रत्येकी ४० ग्रामपंचायती अंतर्गत याप्रमाणे तीनही तालुक्यांतील १२० ग्रामपंचायती अंतर्गत गावांमध्ये ‘नरेगा’ कामांचे ‘सोशल आॅडिट’ सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये ग्राम साधन व्यक्तींच्या पथकांकडून कामांची प्रत्यक्ष पाहणी आणि ‘रेकॉर्ड’ची तपासणी करण्यात येत आहे.
‘या’ कामांचे सुरू आहे ‘सोशल आॅडिट’!
‘नरेगा’ अंतर्गत जिल्ह्यातील अकोला, पातूर व मूर्तिजापूर या तीन तालुक्यांत २०१८-१९ या वर्षांत नरेगा अंतर्गत विविध यंत्रणांमार्फत करण्यात आलेल्या कामांचे ‘सोशल आॅडिट’ सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये सिंचन विहीर, घरकुल, शौचालय, पाणंद रस्ते, वृक्ष लागवड, शोषखड्डे, सलग समतल चर, रोपवाटिका, सार्वजनिक रस्त्यांवरील वृक्ष लागवड, तुती लागवड, फळबाग लागवड इत्यादी कामांचे ‘सोशल आॅडिट’ करण्यात येत आहे.