अकोला : जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या हरिहरपेठमध्ये पूर्ववैमनस्यातून मगेश यादव यांच्या डोक्यात लाकडी दंडा घालून त्यांची हत्या केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा तसेच जुने शहर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी वैभव काळभागे व त्याला सहकार्य करणारी त्याची आई कविता काळभागे या दोघांना सोमवारी रात्री अटक करून मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपी माय-लेकास १२ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.हरिहरपेठेतील सिद्धार्थ नगर येथील रहिवासी असलेल्या मंगेश ऊर्फ मुन्ना यादव (४५) यांचा याच परिसरातील रहिवासी वैभव लक्ष्मण काळभागे याच्यासोबत गत अनेक दिवसांपासून किरकोळ कारणांवरून वाद सुरू होता. या दोघांचे किरकोळ वाद सुरूच असताना सोमवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास मंगेश यादव हे सितला माता मंदिराच्या एका ओट्यावर बसलेले असताना वैभव काळभागे या आरोपीने त्याची आई कविता लक्ष्मण काळभागे हिच्या मदतीने मंगेशच्या पाठीमागून येऊन त्याच्या डोक्यात सेंट्रिंगसाठी वापरण्यात येत असलेला लाकडाचा दांडा घातला. त्यामुळे मंगेश काही क्षणातच रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती तातडीने जुने शहर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मंगेश यादव यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविला. मंगेशची हत्या करणारा वैभव काळभागे घटनास्थळावरून फरार झाला; मात्र स्थानिक गुन्हे शाखा तसेच जुने शहर पोलिसांनी आरोपींचा तातडीने शोध सुरू करून त्याला अटक केली. तर त्यानंतर त्याची आई कविता काळभागे हिला अटक करण्यात आली. याप्रकरणी जुने शहर पोलिसांनी वैभव काळभागे, कविता काळभागे यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२, ५०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर दोन्ही आरोपींना मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस १२ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
मंगेश यादवची हत्या करणाऱ्या माय-लेकास पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2020 6:04 PM