अकोला :वऱ्हाडातील पाच जिल्ह्यांत आतापर्यंत ३४ टक्के क्षेत्रावर पेरण्या आटोपल्या असून, सर्वात कमी पेरणी अकोला जिल्ह्यात केवळ १० टक्के आहे.यावर्षी पाऊस उशिरा सुरू झाला असून, शेतकऱ्यांच्या हातात कृषी निविष्ठा खरेदी करण्यासाठी पैसा नसल्याने पेरणीवर परिणाम झाल्याचे सांगण्यात येत असले, तरी पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांनी यावर्षी उशिरा बियाणे खरेदीला सुरुवात केली. जून महिन्याच्या शेवटी पाऊस सुरू झाला आहे. या पावसाचे वितरण असमान असल्याने शेतकऱ्यांनी अद्याप पेरणीचे धाडस केले नाही. वऱ्हाडातील बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत ११ टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली असून, यामध्ये कापूस १३३.३४ हेक्टर, सोयाबीन ४१२.७५ हेक्टर, तूर ८०.९० हेक्टर, मूग २०३८ हेक्टर तर उडीद २७.१७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. अकोला जिल्ह्यात १० टक्के पेरणी आटोपली आहे. यात कापूस ५०.१० हेक्टर सोयाबीन ३३४.३० हेक्टर, तूर ५४.९० हेक्टर, मूग १९.३८ हेक्टर तर उडीद १४.९० हेक्टरवर पेरणी झाली. वाशिम जिल्ह्यात कापूस ८०.७८ हेक्टर, सोयाबीन १८९१.६९ हेक्टर, तूर ३४३.९८ हेक्टर मूग ५६.१६ हेक्टर तर उडीद ९६.४१ हेक्टरवर पेरणी झाली. अमरावती जिल्ह्यात कापूस ५८९.१८, सोयाबीन ९६३.२४ हेक्टर, तूर ३२३.३४ हेक्टर मूग ३५.१५ हेक्टर तर उडीद ९.९५ हेक्टरवर पेरणी झाली. यवतमाळ जिल्ह्यात कापूस २९ ८८.४४, सोयाबीन १२०५.४८ हेक्टर, तूर ७३८ हेक्टर, मूग ४५.०९ हेक्टर उडीद ४५.२७ हेक्टरवर पेरण्यात आला.- पाऊस बऱ्यापैकी होत आहे. त्यादृष्टीने शेतकºयांनी पेरणीची सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांनी जमिनीत बऱ्यापैकी ओलावा असेल, तर पेरणी करावी, जेथे पावसाचे पाणी साचले असेल, तेथे पाणी काढून वापसा आल्यानंतर कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार पेरणी करावी.- डॉ. विलास भाले,कुलगुरू , डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.