- नीलिमा शिंगणे-जगडअकोला: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळ अमरावती व महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण शिक्षक समन्वय समिती यांच्यावतीने शिर्डी (अहमदनगर) येथे ८ ते १० फेब्रुवारी या कालावधीत पहिले राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन केले आहे. या अधिवेशनास उपस्थित राहणाऱ्या शिक्षकांना तीन दिवसांची विशेष रजा मंजूर करण्यात आली आहे. यासंदर्भात शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांना शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून पत्र पाठविण्यात आले आहे.अधिवेशन काळात विद्यार्थ्यांचा अपुरा राहणारा अभ्यासक्रम हा सुटीच्या कालावधीत विशेष वर्ग घेऊन शिक्षकांनी भरू न काढावा, तसेच या शिक्षकांना पुढील एक वर्षापर्यंत इतर संघटनांच्या कृतिसत्रास किंवा अधिवेशनास उपस्थित राहण्यासाठी कोणतीही रजा अनुज्ञेय असणार नाही, असेदेखील या पत्रामध्ये नमूद केले आहे.शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेच्यावतीने आयोजित या पहिल्या अधिवेशनाबाबत राज्यातील क्रीडा शिक्षकांमध्ये उत्सुकता आणि उत्साह पसरला आहे. क्रीडा शिक्षकांच्या समस्या सोडविण्याकरिता हे अधिवेशन दिशादर्शक ठरणार आहे. क्रीडा क्षेत्रातील समस्या आणि उपाययोजना संदर्भातील महत्त्वपूर्ण सात विषयांवर या अधिवेशनात ऊहापोह होणार आहे. राज्यभरातील क्रीडा शिक्षक आपल्या मागण्या मांडून त्याबाबत कसा अन्याय झाला, हे पुराव्यासह सादर करणार आहेत. भविष्यात क्रीडा व शारीरिक शिक्षण आणि शिक्षक वाचविण्यासाठी ठराव मंजूर करू न शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.हे अधिवेशन शासन मान्यतेने घेण्यात येत असून, शासकीय नियमानुसार सर्व सुविधा क्रीडा शिक्षकांना मिळणार आहेत. अधिवेशन काळ हा सेवाकाळ धरण्यात येणार आहे. शाळा व्यवस्थापनाकडून अशा अधिवेशनास शिक्षकांना रजा मिळत नाही; मात्र या अधिवेशनास रजा मिळावी, याकरिता संघटनेच्या पदाधिकाºयांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. यामध्ये पदाधिकाºयांना यश मिळाले आहे. राज्य क्रीडा शिक्षक महासंघ, शारीरिक शिक्षण समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण महामंडळ, महाराष्ट्र राज्य क्रीडा विकास परिषद या संघटना प्रथमच अधिवेशनानिमित्त एकत्रित येऊन क्रीडा शिक्षकांच्या हक्कासाठी लढा देत आहेत.
अधिवेशनात १० हजार क्रीडा शिक्षक सहभागी होण्याची अपेक्षा आहे. आतापर्यंत चाडेचार हजार शिक्षकांची नोंदणी झाली आहे. शासनाने विशेष रजा मंजूर केल्याने निश्चितच १० हजारांपेक्षा अधिक शिक्षक उपस्थित राहतील.- राजेंद्र कोतकर,अध्यक्ष, राज्य क्रीडा शिक्षक महासंघ.