शहरात १७ जण काेराेनाबाधित
अकाेला: महापालिका क्षेत्रात काेराेनाबाधित रुग्णांची संख्या कमी हाेत चालली आहे. गुरुवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त अहवालानुसार शहरातील १७ जणांना काेराेनाची लागण झाली आहे. यामध्ये पूर्व झाेन ११, पश्चिम झाेन ०, उत्तर झाेन २ व दक्षिण झाेनमध्ये काेराेनाचे ४ रुग्ण आढळून आले आहेत.
५९८ जणांनी केली काेराेना चाचणी
अकाेला: शहराच्या विविध भागांत काेराेनाचा प्रादुर्भाव झाला आहे़ काही दिवसांपासून काेराेनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याचे दिसत आहे. दरम्यान, काेराेनाची लक्षणे आढळून येणाऱ्या सुमारे ५९८ जणांनी गुरुवारी चाचणी केली़ यामध्ये ९६ जणांनी आरटीपीसीआर व ५०२ जणांनी रॅपिड अँटिजन चाचणी केली़ संबंधितांचे अहवाल चाचणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे पाठविण्यात आले आहेत.
नायगाव परिसरात रस्त्यांचे निर्माण करा !
अकाेला: शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील नायगाव, वाकापूर, शिलाेडा आदी परिसरातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली असून, नागरिकांना चालण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्यामुळे मनपा प्रशासन व नगरसेवकांप्रति रहिवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. नागरिकांच्या समस्यांची दखल घेत मनपा प्रशासनाने रस्त्याचे निर्माण करण्याची मागणी समाेर आली आहे.
जठारपेठ चाैकात घाणीचे साम्राज्य
अकाेला: शहरातील जठारपेठ चाैकात मुख्य रस्त्यालगत भाजीबाजारात भाजीपाला व इतर साहित्याची विक्री केली जाते़ भाजीपाला व फळविक्री केल्यानंतर सदर व्यावसायिक सडका भाजीपाला रस्त्यालगत उघड्यावर फेकून देत असल्याने अस्वच्छतेची समस्या निर्माण झाली आहे़ महापाैर अर्चना मसने, माजी महापाैर विजय अग्रवाल यांचा या भागात वावर राहताे. तरीदेखील या समस्येकडे दुर्लक्ष केले जात आहे.
काेराेनाच्या नियमांचे उल्लंघन
अकाेला: संसर्गजन्य काेराेना विषाणूचा आलेख कमी हाेत चालल्याचे चित्र आहे. दरम्यान, ही बाब लक्षात घेता शासनाने निर्बंध शिथिल करीत व्यवसाय सुरू करण्यासाठी सायंकाळी ४ वाजेपर्यंत परवानगी दिली. या निर्णयामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी बाजारात साेशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवित गर्दी हाेत असल्याचे गुरुवारी पहावयास मिळाले.
आजपासून शहरात वृक्षारोपण
अकाेला: पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या धोरणांतर्गत महानगरपालिका प्रशासनाद्वारे शुक्रवारपासून शहरातील विविध ठिकाणी झाडे लावण्याच्या माेहिमेला सुरुवात होत आहे. त्या अनुषंगाने दक्षिण क्षेत्रांतर्गत प्रभाग क्र. १९ येथील आनंद नगर आणि प्रभाग क्र. १६ मधील कैलास टेकडी येथील हिंदू स्मशानभूमी येथे दुपारी ३ वाजता वृक्षारोपण केले जाणार आहे.