शहरात डेंग्यूसदृश साथीचा फैलाव; हिवताप विभाग निष्क्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:17 AM2021-03-07T04:17:59+5:302021-03-07T04:17:59+5:30
मागील चार वर्षांपासून अकोलेकरांना डेंग्यूसदृश आजाराने हैराण करून सोडले आहे. घरातील फ्रीज, कुलर, शोभिवंत फुलांची कुंडी, पाण्याची टाकी तसेच ...
मागील चार वर्षांपासून अकोलेकरांना डेंग्यूसदृश आजाराने हैराण करून सोडले आहे. घरातील फ्रीज, कुलर, शोभिवंत फुलांची कुंडी, पाण्याची टाकी तसेच अनेक दिवसांपासून साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होते. एडिस एजिप्ताय या डासाने चावा घेतल्यास डेंग्यूचा फैलाव होतो. डेंग्यू किंवा मलेरिया झालेले अनेक रुग्ण शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल न होता खासगी रुग्णालयात दाखल होतात. शहरातील काही खासगी रुग्णालयांत डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. आगामी दिवसांत अशा रुग्णांच्या संख्येत वाढ होणार असल्याची भीती वर्तविली जात आहे. जीवघेण्या डेंग्यूचा धोका ओळखून महापालिकेच्या मलेरिया विभागासह वैद्यकीय आरोग्य यंत्रणेने वेळीच उपाययोजना राबवणे अपेक्षित असताना संबंधित विभाग कमालीचे निष्क्रिय ठरत असल्याचे दिसून येत आहे. डासांची पैदास रोखण्यासाठी प्रभागांमध्ये तसेच घराघरांमध्ये धुरळणी करणे व साचलेल्या पाण्यांमध्ये औषध फवारणी करून पाणी वाहते करण्यासाठी महापालिका प्रशासनाने प्रभावी मोहीम राबवण्याची गरज असताना हिवताप विभागाने झोपेचे सोंग घेतल्याचे चित्र आहे.
रुग्ण डेंग्यूसदृश असला तरीही...
डेंग्यूची लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांची दोन प्रकारे चाचणी केली जाते. ‘रॅपिड’चाचणीचे तीन प्रकार असून तीनपैकी कोणतीही चाचणी ‘पॉझिटिव्ह’आल्यास तो रुग्ण डेंग्यूसदृश समजला जातो. तसेच ‘एलेन्झा’चाचणी केली असेल तर त्या रुग्णाला डेंग्यू झाल्याचे निश्चित मानले जाते. ‘रॅपिड’चाचणीद्वारे डेंग्यूसदृश रुग्ण आढळला तरीही त्याच्यावर मात्र डेंग्यूच्या रुग्णाप्रमाणेच उपचार केले जातात, हे येथे उल्लेखनीय.
हिवताप विभागाकडे अवघ्या सात ते आठ फॉगिंग मशीन आहेत. त्यामुळे प्रभागात धुरळणीसाठी चार-चार महिने प्रतीक्षा करावी लागते. फवारणी दैनंदिन करणे अपेक्षित आहे. डासांपासून होणारे आजार पाहता उपाययोजनेसाठी मलेरिया विभाग निष्क्रिय ठरला आहे.
-राजेश मिश्रा, गटनेता शिवसेना