राज्यात कुरिअर-पार्सल सेवा देणाऱ्या एजन्सिची दोन कोटींची बँक गॅरंटी एसटी मंडळाने गोठविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 02:09 PM2017-12-21T14:09:19+5:302017-12-21T14:14:15+5:30
अकोला : राज्यात कुरिअर-पार्सल सेवा देणाºया एस.के. टान्सलाइन्स कंपनी सोबतचा करार रद्दबातल ठरवून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने कंपनीची दोन कोटी रुपयांची बँक गॅरंटी गोठविली आहे.
संजय खांडेकर
अकोला : राज्यात कुरिअर-पार्सल सेवा देणाऱ्या एस.के. टान्सलाइन्स कंपनी सोबतचा करार रद्दबातल ठरवून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने कंपनीची दोन कोटी रुपयांची बँक गॅरंटी गोठविली आहे. या कारवाईसोबतच एसटी मंडळाने राज्यभरातील आगारात असलेल्या कुरिअर-पार्सल कार्यालयांचा ताबा घेत स्वत:ची यंत्रणा बुधवारपासून लावली आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने जळगाव येथील मेसर्स एस.के. टान्सलाइन्स या कंपनीशी २० नोव्हेंबर २०१५ रोजी दोन वर्षांसाठी करार केला होता. त्या करारानुसार मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, ठाणे, नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, गडचिरोली या आगारातून सुरू असलेल्या कुरिअर-पार्सलची एसटी मंडळाची यंत्रणा कंपनीकडे सोपविली होती. महामंडळाच्या अटी-शर्तींना तडा देत कंपनीने आक्षेपार्ह वस्तूंची वाहतूक केली. नाशवंत पदार्थांची वाहतूक, गॅस आणि अॅसिडची वाहतूकही कंपनीने केली. या प्ररकरणी अन्न व औषध प्रशासनाने कारवाईदेखील केलेली आहे. दरम्यान, जुलैपासून अंमलात आलेल्या जीएसटीचा भरणाही कंपनीने अद्याप केलेला नाही. १८ लाख ७५ हजार रुपये मासिकप्रमाणे, सहा महिन्यांची १ कोटी १२ लाख ५० हजार रुपयांची जीएसटीची थकबाकी कंपनीवर आहे. त्यामुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळाने मेसर्स एस.के. टान्सलाइन्स या कंपनीची दोन कोटी रुपयांची बँग गॅरंटी गोठवून ही कारवाई केली आहे. दोन वर्षांतील कंपनीची वादग्रस्त कारकीर्द पाहता राज्य मार्ग परिवहन मंडळाने कंपनीसोबतचा करार रद्द करीत, १८ डिसेंबरपासून राज्यभरातील कुरिअर-पार्सल कार्यालयांचा ताबा घेतला. महामंडळाने आगाराच्या या कार्यालयात स्वत:ची माणसे लावली असून, दोन दिवसांपासून राज्यातील कुरिअर-पार्सल सेवा कर्मचारी सांभाळीत आहेत.
विभाग नियंत्रकांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे १८ डिसेंबरपासून एसटी महामंडळातील दोन जुन्या कर्मचाºयांची ड्यूटी एसटी आगार दोन मधील पार्सल-कुरिअर कार्यालयात लावण्यात आली आहे. पुढील आदेशापर्यंत ही व्यवस्था ठेवण्याचे सांगितले गेले आहे.
-अरविंद पिसोडे, व्यवस्थापक, मध्यवर्ती बसस्थानक अकोला.