अकोला : अकोला : एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करणाऱ्या स्तनदा मातांसाठी २०१४ मध्ये आगार असलेल्या बस स्थानकांवर हिरकणी कक्ष उघडण्यात आले होते. मोठा गाजावाजा करून उघडलेल्या या कक्षांना पाच वर्षांनंतर कुलूप लावण्यात आल्याचे धक्कादायक चित्र लोकमतने ११ मे रोजी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आले आहे. अकोला मध्यवर्ती बसस्थानकावरील हिरकणी कक्ष केवळ शोभेची वास्तू झाली आहे.अकोटातील हिरकणी कक्षात चक्क भंगाराचे साहित्य ठेवण्यात आले आहे तर मूर्तिजापुरात या कक्षात विनावाहक बसची तिकीट देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तेल्हाºयात रंगरंगोटीच्या नावाखाली हा कक्षच बंद करण्यात आल्याचे चित्र आहे.
हिरकणी कक्ष गेल्या अनेक महिन्यांपासून बंद अकोला मध्यवर्ती बसस्थानकावरील हिरकणी कक्षाचे अनेक महिन्यांपासून दार उघडण्याची तसदीदेखील कुणी घेतलेली नाही. त्यामुळे कक्षाबाहेर आणि जागा मिळेल तिथे आपल्या पाल्यांना दूध पाजण्याची वेळ प्रवास करणाºया माता-बहिणींवर आली आहे. अकोला मध्यवर्ती बसस्थानकाच्या सायकल स्टॅन्डजवळ असलेले हिरकणी कक्ष गेल्या अनेक महिन्यांपासून बंद पडले आहे. त्यामुळे बाळांतिण महिलांना आपल्या पाल्यास आडोसा मिळेल तेथे दूध पाजावे लागत आहे.याप्रकरणी आगार क्रमांक दोनचे प्रमुख व्यवस्थापक येवले यांना भ्रमणध्वणीवरून संपर्क साधला असता, त्यांनी चुप्पी साधली. कोणताही प्रतिसाद त्यांनी दिला नाही. आगारप्रमुख प्रसार माध्यमांना नेहमी टाळत असल्याच्या अनेक तक्रारी वरिष्ठांकडे याआधीच पोहोचल्या आहेत.
मूर्तिजापुरात हिरकणी कक्षच गुंडाळला!- दीपक अग्रवाल
मूर्तिजापूर : स्रनदा मातांसाठी मूर्तिजापूर बस स्थानकावर मोठा गाजावाजा करून हिरकणी कक्ष उघडण्यात आला होता. या कक्षामुळे स्रनदा मातांना दिलासा मिळत होता. आगार प्रशासनाने हा कक्षच गुंडाळल्याचे ११ मे रोजी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघड झाले आहे. या कक्षात विना वाहक गाडीची तिकीटे फाडण्यात येत असल्याचे चित्र आहे.आगार असलेल्या बस स्थानकांमध्ये २०१४ मध्ये स्रनदा मातांसाठी हिरकणी कक्ष सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानुसार मूर्तिजापूर बस स्थानकावरही कक्ष सुरू करण्यात आला होता. मूर्तिजापूर बस स्थानकावरून शेकडो प्रवासी प्रवास करतात. यामध्ये स्तनदा मातांचाही समावेश आहे. हिरकणी कक्षामुळे अशा मातांना दिलासा मिळाला होता; मात्र आगार प्रशासनाने हा कक्षच गुंडाळला असल्याचे चित्र शनिवारी समोर आले. आधी हिरकणी कक्ष उघडलेल्या ठिकाणी थेट मूर्तिजापूर ते दर्यापूर या विनावाहक बससाठी तिकीट देण्यात येत असल्याचे समोर आले. या कक्षातील मातांसाठी असलेल्या सुविधाही हटवण्यात आल्या असून, तेथे केवळ एक टेबल आणि खुर्ची टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले.
तेल्हाºयात हिरकणी कक्षाला कुलूप- प्रशांत विखे
तेल्हारा : मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या तेल्हारा बस स्थानकातील हिरकणी कक्षाला शनिवारी कुलूप लावलेले असल्याचे स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आले. आपल्या बाळांना स्तनपान करण्यासाठी महिलांना उघड्या ओट्यांचा आधार घ्यावा लागत आहे.तेल्हारा येथील बस स्थानकावरून मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करतात. यामध्ये स्तनदाह महिलांचाही समावेश आहे. या महिलांसाठी आगार असलेल्या प्रत्येक बस स्थानकावर हिरकणी कक्ष सुरू करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला होता. त्यानुसार २०१४ मध्ये तेल्हारा बस स्थानकावर हिरकणी कक्ष सुरू करण्यात आला होता. त्यामध्ये सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या; मात्र सध्या या कक्षाला कुलूप असल्याचे शनिवारी आढळले. तेल्हारा बसस्थानक हे तालुक्यातील एकमेव मोठे बसस्थानक असून आजूबाजूच्या खेड्यामधील तसेच बाहेर गावावरून आलेले महिला प्रवासी या बसस्थानकावर विसावा घेतात. अनेकदा ज्या गावाला जायचे आहे ती बस अनेक तास लागत नसल्याने यावेळेमध्ये महिला प्रवाशांना बाळांना दूध पाजण्याकरिता हिरकणी कक्षामुळे आधार मिळत होता; मात्र गेल्या काही दिवसांपासून या कक्षालाच कुलूप ठोकण्यात आल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला आहे. नियमानुसार हिरकणी कक्षामध्ये महिलांना बसण्याची व्यवस्था, उन्हाळा असल्यामुळे कूलर किंवा फॅन, पिण्याचे पाणी अशी स्वतंत्र व्यवस्था असावी लागते; परंतु या कक्षाला कुलूप असल्याने आतमध्ये नेमके साहित्य आहे की नाही, हे कळू शकले नाही. तेल्हारा बसस्थानक हे उत्पन्नामध्ये जिल्ह्यामध्ये अग्रेसर आहे; परंतु प्रवाशांकरिता खिळखिळ्या हद्दपार झालेल्या भंगार बसेस माथी मारण्यात येऊन कुठलीच पुरेशी सुविधा उपलब्ध न करता उलट बसस्थानकाच्या रंगरंगोटीचे काम सुरू आहे.अकोटात साफसफाई करण्याचे साहित्य भरले!- विजय शिंदे
अकोट : अकोट बस स्थानकावर स्तनदा मातांसाठी उघडण्यात आलेल्या हिरकणी कक्षाचा स्टोअर रूम म्हणून वापर करण्यात येत आहे. फॅन, कूलर आदी सुविधा तर सोडा; पण आई व बाळाला स्तनपान करण्याकरिता बसण्याची व्यवस्थाही नसून त्यामध्ये साफसफाईचे साहित्य ठेवले आहे. हा प्रकार 'मदर्स डे'च्या आदल्या दिवशी शनिवारी लोकमतने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघड झाला.बसस्थानकावर स्तनदा मातेचा आधार म्हणून ८० चौरस फूट खोलीत हिरकणी कक्ष उघडण्याचा आदेश एसटी महामंडळाने दिला होता. त्यानुसार अकोट बसस्थानकावर एका खोलीत हिरकणी कक्ष उघडण्यात आला. हा कक्ष सहज ओळखता यावा, याकरिता बाहेरील बाजूस तशी स्तनदासंदर्भातील चित्रे लावण्यात आली आहेत. सार्वजनिक ठिकाणी स्तनपान केल्यास भुवया उंचावल्या जातात, म्हणून प्रवासाकरिता आलेल्या महिलेला सन्मानाने स्तनपान करता यावे, बाळ सुदृढ राहावे, या उद्देशाने उघडण्यात आलेल्या कक्षाची दुरवस्था झाली आहे. या कक्षात बसस्थानकातील साफसफाई करण्याचे साहित्य भरलेले आढळून आले. खोली उघडण्यात आली फक्त नावापुरती. खोलीच्या स्लॅबची छपाई कोसळत आहे, त्यामुळे आधीच धोका असताना स्तनपानाकरिता बसण्याची व्यवस्था,सुविधा नाही. कक्षात साफसफाई करण्याचे साहित्य, इतर भंगार साहित्य पडलेले आहे. त्यामुळे मातांना उघड्यावरच पदराआड बाळाला स्तनपान करावे लागत आहे. कक्षाची उपयोगिता फक्त नावापुरती राहिली असून, या गंभीर प्रकाराकडे एसटी प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे वास्तव अकोट बसस्थानकावर समोर आले आहे.