अकोला: भीषण पाणीटंचाई जाणवत असलेल्या जिल्ह्यातील पातूर व बार्शीटाकळी तालुक्यातील एकून पाच गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे; परंतु या ठिकाणी शासनाच्या नियमांना हरताळ फासला जात असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने १२ मे रोजी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून उघड झाले आहे. टँकरचालकांकडे लॉगबुकच उपलब्ध नाहीत, तर टँकरमध्ये बसविण्यात आलेल्या जीपीएस यंत्रणाही कुचकामी असल्याचे स्टिंग आॅपरेशनमधून समोर आले आहे. एका ठिकाणी तर टँकर चक्क बेवारस उभा असल्याचेही दिसून आले. त्यामुळे जिल्ह्यात टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा रामभरोसे असल्याचे समोर आले आहे.पातूर तालुक्यातील पिंपळखुटा, उमरा व सुकळी, तर बार्शीटाकळी तालुक्यातील वरखेड देवदरी व पुनोती बु. या गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. लोकमतने रविवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून प्रशासनाचे पितळ उघडे झाले आहे. लोकमत प्रतिनिधींनी केलेल्या पाहणीत पातूर तालुक्यातील उमरा व सुकळी या गावांमध्ये टँकरचालकाकडे लॉगबुकच उपलब्ध नसल्याचे दिसून आले. जीपीएस यंत्र होते; परंतु त्याचे नियंत्रण कोणाकडे हे चालकाला सांगता आले नाही. तर बार्शीटाकळी तालुक्यातील वरखेड देवदरी व पुणोती बु. या गावांमध्ये हीच परिस्थिती दिसून आली. एवढेच नव्हे, तर वरखेड गावासाठी असलेला टँकर अधिग्रहित केलेल्या विहिरीवर बेवारस स्थितीत उभा असल्याचे दिसून आले. टँकरद्वारे गावांमधील विहिरींत पाणी सोडले जाते; परंतु या विहिरीच अस्वच्छ असल्याचेही ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमधून समोर आले आहे.