CoronaVirus : ‘भरतीया’मध्ये नमुने घेणे बंद; भाजप-सेनेने आक्षेप घेताच सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 10:36 AM2020-05-24T10:36:36+5:302020-05-24T10:37:21+5:30

भरतीया रुग्णालयात नमुने घेणे बंद केल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री घडला.

Stop taking samples in ‘Bhartiya’; BJP-Sena taking objections | CoronaVirus : ‘भरतीया’मध्ये नमुने घेणे बंद; भाजप-सेनेने आक्षेप घेताच सुरू

CoronaVirus : ‘भरतीया’मध्ये नमुने घेणे बंद; भाजप-सेनेने आक्षेप घेताच सुरू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासन व जिल्हा सामान्य रुग्णालयाचे धिंडवडे निघत असल्यामुळे की काय, सामान्य रुग्णालयाच्यावतीने भरतीया रुग्णालयात नमुने घेणे बंद केल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री घडला. या प्रकारावर शनिवारी भाजप तसेच शिवसेनेच्यावतीने तीव्र आक्षेप घेतल्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयाने शनिवारी सायंकाळपासून ही सुविधा पुन्हा सुरू केली. यानिमित्ताने सामान्य रुग्णालयाच्या मनमानी कारभाराचा प्रत्यय आला असून, याप्रकरणी मनपाने कानावर हात ठेवले आहेत.
महापालिका क्षेत्रात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत चालली आहे. कोरोना विषाणूचा ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या प्रभाग क्रमांक ११ मधील बैदपुरा, प्रभाग क्रमांक-७ मधील फिरदोस कॉलनी, भवानी पेठ, प्रभाग क्रमांक-२ मधील अकोट फैल तसेच जुने शहरातील प्रभाग क्रमांक-९ अंतर्गत येणाऱ्या खैर मोहम्मद प्लॉटमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. यादरम्यान कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील निकटवर्तीय संशयित रुग्णांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील असुविधांमुळे त्या ठिकाणी जाण्यास नकार दिला होता. संशयित रुग्णांची तपासणी न झाल्यास पावसाळ्यात शहरात मोठा हाहाकार निर्माण होईल, या विचारातून मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी मनपाच्या भरतीया रुग्णालयात संशयित रुग्णांच्या घशातील स्रावाचे नमुने घेण्यास प्रारंभ केला.
नमुने घेण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील चार वैद्यकीय आरोग्य अधिकारी उपस्थित होते. संशयित रुग्णांनी नमुने देण्यासाठी पुढाकार घेतल्यामुळे कोरोनाचे तातडीने निदान होणे शक्य झाले. कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत चालल्यामुळे जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
त्यामुळे हा आकडा वाढू न देण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने अचानक शुक्रवारी रात्रीपासून भरतीया रुग्णालयातील तपासणी बंद करण्यात आली.


भाजप-सेनेच्यावतीने अधिकाºयांची कानउघाडणी
जिल्हा सामान्य रुग्णालयाने रुग्णांचे नमुने घेण्याची प्रक्रिया बंद केल्याचे शनिवारी समोर येताच भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आ. रणधीर सावरकर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आ. नितीन देशमुख, भाजपचे महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, सेनेचे शहर प्रमुख राजेश मिश्रा यांनी सामान्य रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाºयांना चांगलेच खडे बोल सुनावले. त्यानंतर ही सुविधा शनिवारी सायंकाळपासून पुन्हा सुरू करण्यात आली.

 

Web Title: Stop taking samples in ‘Bhartiya’; BJP-Sena taking objections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.