लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शालेय जीवनातच विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण केली, संशोधन, प्रतिकृतींसाठी त्यांना प्रोत्साहन दिले तर भविष्यात विद्यार्थ्यांमधूनच वैज्ञानिक घडू शकतात. अशाच एका आठवीतील विद्यार्थ्याने जुगाड टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून स्मार्ट हॅण्ड वॉश तयार केले आहे. विज्ञान प्रदर्शनात या विद्यार्थ्याच्या ‘स्मार्ट हॅण्ड वॉश’ प्रतिकृतीने लक्ष वेधले.मूर्तिजापूर तालुक्यातील राजुरा घाटे येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक मराठी शाळेत इयत्ता आठवीत शिकणाऱ्या प्रेम संजय भगत याने विविध उपकरणांचा वापर करून हॅण्ड वॉश तयार केले असून, या हॅण्ड वॉशमुळे पाण्याची बचत होते. नळाखाली हात धुवायला ठेवला तर नळातून पाणी येण्यास सुरुवात होते आणि हात काढला तर पाणी येणे आपोआप बंद होते. प्रेम भगत हा ग्रामीण भागातील विद्यार्थी. तसा तो खांदला गावचा राहणारा. वडील शेतकरी. त्याच्या गावात पाण्याची भीषण टंचाई.आईला पाणी आणण्यासाठी शेतातील विहिरीवर जावे लागते. हात धुण्यासाठी लोक भरपूर पाण्याचा वापर करतात. हात धुवायचे; परंतु त्यासाठी पाण्याची बचत झाली पाहिजे. यासाठी स्मार्ट हॅण्ड वॉश बनविण्याची कल्पना त्याच्या डोक्यात आली. त्याने शिक्षक मनोज लेखनार यांच्याकडून मार्गदर्शन घेत, दोन पाण्याच्या कॅन, एक एलडीआर सेंसर, एलईडी लाइट, नळ, पाइप, बकेट, डीसी मोटरपंप, दोन ९ व्होल्टची बॅटरी, आयसी, रिले, व्हेरिएबल रेझिस्टन्स, स्वीच, एलईडी आदी साहित्याचा वापर केला आहे. त्याने बनविलेल्या स्मार्ट हॅण्ड वॉश प्रतिकृतीचे विज्ञान प्रदर्शनात शिक्षकांसोबतच नागरिकांनीसुद्धा कौतुक केले.
समुद्राच्या लाटांपासून वीज निर्मितीची प्रतिकृती!अकोट तालुक्यातील वरूर जऊळका येथील पं. नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या भाग्यश्री वरईकर, सोनाक्षी नारे, साक्षी राजगुरू यांनी समुद्राच्या लाटांपासून वीज निर्मितीची प्रतिकृती विज्ञान प्रदर्शनात मांडली आहे. नेहमीच विजेची कमतरता भासते. देशाला ७ हजार ५१७ किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला असून, प्रचंड लाटांमुळे अनेकदा नुकसान होते. या समुद्री लाटांद्वारे हवेचा दाब तयार करून टर्बाइन फिरविणे व वीज निर्मिती करणे, तळाशी रुंद असलेल्या पाइपला वर निमुळते केल्यास हवेचा दाब वाढतो आणि टर्बाइनवर हवा वेगाने फेकल्या जाऊन वीज निर्मिती करणे शक्य असल्याचे प्रयोगातून दाखविले आहे. या विद्यार्थिनींचेसुद्धा विज्ञान प्रदर्शनातील मान्यवरांनी कौतुक केले.