पंचविशीच्या आतील विद्यार्थ्यांना लढविता येणार महाविद्यालयीन निवडणूक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:05 PM2019-07-20T12:05:48+5:302019-07-20T12:05:53+5:30
२५ वर्षे वयाच्या आतीलच विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन निवडणुकीच्या रिंगणात उतरता येणार आहे.
अकोला: तब्बल २९ वर्षांनंतर राज्यातील वरिष्ठ महाविद्यालये, विद्यापीठांमध्ये छात्रसंघाच्या खुल्या पद्धतीने निवडणुका होणार आहेत; परंतु या निवडणुकीसाठी उच्च शिक्षण विभागाने जाचक अटी लादल्या आहेत. २५ वर्षे वयाच्या आतीलच विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन निवडणुकीच्या रिंगणात उतरता येणार आहे. यासोबतच विद्यार्थी हा मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाचा पूर्णवेळ विद्यार्थी असावा आणि तोही ‘एटीकेटी’ नसणारा असावा, अशी अट असल्यामुळे विद्यार्थी संघटनांच्या हेतूवर पाणी फेरल्या गेले आहे. महाविद्यालयीन निवडणुकीतील अटी व नियम अडचणीचे ठरणार असल्यामुळे विद्यार्थी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये आता खुल्या पद्धतीने निवडणुका होणार असल्यामुळे अभाविप, एनएसयूआय, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, सम्यक विद्यार्थी आंदोलन, रिविफे, एसएफआय यासारख्या विद्यार्थी संघटना कामाला लागल्या आहेत. महाविद्यालयीन निवडणुकांदरम्यान हाणामारी, उमेदवार पळविणे, हल्ला करण्यासारख्या प्रकारांना आळा घालण्याच्या दृष्टिकोनातून उच्च शिक्षण विभागाने काही नियम व अटी घातल्या आहेत. यामध्ये उमेदवार हा पंचविशीच्या आतील असावा, तो मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या नियमित व पूर्णवेळ अभ्यासक्रमाचा विद्यार्थी असावा, तो एटीकेटी घेतलेला नसावा. गुणवत्ताधारक विद्यार्थीच निवडणूक लढवू शकेल, गुन्हा दाखल असलेल्या विद्यार्थ्याला निवडणूक लढविता येणार नाही आणि एकाच वर्गात पुन्हा प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याला निवडणूक लढविता येणार नाही, असे नियम घातलेले आहेत. विशेष म्हणजे, कोणत्याही विद्यार्थी संघटनेच्या उमेदवाराला महाविद्यालय परिसरात पोस्टर, बॅनर लावता येणार नाही. विनापरवानगी भाषणबाजी करता येणार नाही. या नियमांमुळे अभाविप ही विद्यार्थी संघटना वगळता, इतर विद्यार्थी संघटनांची पंचाईत झाली आहे. प्राचार्यांनी दिलेल्या जागेवरच विद्यार्थी संघटनांच्या उमेदवारांना भूमिका मांडता येणार आहे. निवडणुकीदरम्यान महाविद्यालय परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. महाविद्यालयीन निवडणुकांची चाहूल लागल्यामुळे विद्यार्थी संघटना कामाला लागल्या आहेत. उमेदवारांची चाचपणी विद्यार्थी संघटनांनी सुरू केली आहे.
गुणवत्ताधारक उमेदवारांची होणार पळवापळवी!
निवडणुकीसाठी केलेल्या अटी व नियमांमुळे विद्यार्थी संघटनांची पंचाईत झाली आहे; परंतु वेळेवर धावपळ नको म्हणून विद्यार्थी संघटनांच्या नेत्यांनी आतापासून गुणवत्ताधारक, पंचविशीच्या आतील उमेदवारांचा शोध सुरू केला आहे. त्यामुळे गुणवत्ताधारक उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविण्यासाठी विद्यार्थी संघटनांमध्ये चांगलीच ओढाताण होणार आहे. एवढेच नव्हे, तर उमेदवार पळविण्याचे प्रकारसुद्धा घडणार आहेत.
विद्यार्थी मतदाराला पाच मतांचा अधिकार
निवडणुकीत विद्यार्थी मतदाराला कमाल पाच मते देण्याचा हक्क आहे. मतदार हा परिषद अध्यक्ष, सचिव, महिला प्रतिनिधी, राखीव प्रवर्गातील प्रतिनिधी आणि वर्ग प्रतिनिधी या पाच उमेदवारांना मत देऊ शकणार आहे. निवडणुकीची मतमोजणी व निकाल मतदान दिवशी तर विद्यापीठ छात्रसंघ निवडणुकीची मतमोजणी मतदानाच्या तिसऱ्या दिवशी होणार आहे.
तरुणाईचा कल कोणाकडे?
महाविद्यालयांमध्ये शिकणाºया तरुणांना प्रथमच महाविद्यालयीन निवडणुकीत मतदानाची संधी मिळणार आहे. त्यामुळे तरुणाईचा कल कोणत्या पक्षाच्या विद्यार्थी संघटनेकडे आहे, हे दिसून येईल. ‘एनएसयूआय’ ही काँग्रेसप्रणित, अभाविप ही भाजप व संघप्रणित, सम्यक विद्यार्थी आंदोलन ही वंचित बहुजन आघाडीप्रणित तर रिपब्लिकन विद्यार्थी परिषद ही रिपाइंप्रणित आणि एसएफआय ही डावे पक्षप्रणित विद्यार्थी संघटना आहे. युवा सेना ही शिवसेना तर मनविसे ही मनसेप्रणित संघटना आहे. त्यामुळे तरुणाईचा कल कोणत्या पक्षाकडे अधिक आहे, हे मतदानावरून स्पष्ट होईल.