अकोला: शालेय विद्यार्थ्यांना गणवेशासाठी दिली जाणारी रक्कम थेट हस्तांतरण प्रक्रियेतून वगळण्यात आली आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत राज्यातील लाखो मुलींसह इतर प्रवर्गातील लाभार्थी विद्यार्थ्यांना गणवेशाची रक्कम देण्यासाठी केंद्र शासनाचा निधी अद्यापही प्राप्त झालेला नाही. त्यातच २६ जून रोजी शाळा प्रवेश असताना विद्यार्थ्यांचे गणवेश कधी तयार होतील, ही समस्या विद्यार्थ्यांपुढे निर्माण झाली आहे.विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देताना अनुदान थेट वा वस्तू रूपात न देता रोख स्वरूपात थेट लाभार्थींच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय शासनाने ५ डिसेंबर २०१६ रोजी घेतला होता. त्या निर्णयात लाभाच्या वस्तूंची यादीही देण्यात आली होती. त्यामध्ये आठव्या क्रमांकावर गणवेशाचा उल्लेख करण्यात आला; मात्र गणवेशाची ४०० रुपये रक्कम मिळण्यासाठी बँक खाते उघडण्यापासून त्यामध्ये ठेव रक्कम ठेवण्याच्या अटींमुळे योजनाच बारगळली. त्यातच एसएमएस, जीएसटी तसेच किमान रक्कम शुल्कांचा भुर्दंड कोण भरेल, या धाकानेच विद्यार्थ्यांची खातीही बँकांनी सुरूच केली नाहीत. त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना गेल्या तीन वर्षांत गणवेशाची मदत मिळाली नाही. योजनेचा फोलपणा वाढल्याने शासनाने काही योजना ‘डीबीटी’तून वगळण्यासाठी समिती गठित केली. त्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार गणवेश वाटपाची योजना थेट हस्तांतरण प्रक्रियेतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार अकोला जिल्ह्यात लाभार्थी विद्यार्थ्यांसाठी ३ कोटी ८० लाख २८०० रुपये निधीची गरज आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत केंद्र शासनाकडून राज्याला हा निधी दिला जातो; मात्र केंद्राकडूनच निधी प्राप्त झालेला नाही. त्यामुळे राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने जिल्हानिहाय निधी मागणीचे प्रस्ताव मागविले आहेत. अकोला जिल्ह्यात एकूण ६३३३८ लाभार्थी आहेत. त्यांना दोन गणवेशासाठी प्रतिविद्यार्थी ६०० रुपये दिले जाणार आहेत; मात्र ही रक्कम विद्यार्थ्यांपर्यंत कधी पोहोचणार, यावरच गणवेश वाटप योजनेचे भवितव्य अवलंबून आहे.
निधीसाठी तजवीजजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना वेळेत गणवेश देण्यासाठी पंचायत समिती स्तरावर शिल्लक निधीचा धांडोळा घेतला जात आहे. त्यामध्ये अकोला, बाळापूर, मूर्तिजापूर पंचायत समितीमध्ये पुरेसा निधी आहे, तर इतर चार तालुक्यांमध्ये तुटवडा आहे. त्यासाठी निधीची मागणी करण्यात आल्याची माहिती सर्व शिक्षा अभियानातील संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.- पंचायत समितीनिहाय विद्यार्थीपंचायत समिती विद्यार्थीअकोला १३३७७अकोट ११०८०बाळापूर ९८७०बार्शीटाकळी ७८१९मूर्तिजापूर ६७३५पातूर ६०७७तेल्हारा ८४७०