पदाधिकाऱ्यांच्या कामकाजाची कुंडली सादर करा!

By admin | Published: May 17, 2017 02:16 AM2017-05-17T02:16:20+5:302017-05-17T02:16:20+5:30

शिवसेना संपर्क प्रमुखांचे निर्देश; शिवसेनेत फेरबदलाचे संकेत

Submit the working hours of the office bearers! | पदाधिकाऱ्यांच्या कामकाजाची कुंडली सादर करा!

पदाधिकाऱ्यांच्या कामकाजाची कुंडली सादर करा!

Next

आशिष गावंडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणीसह महिला संघटन आणि युवा सेना संघटनेत सक्रिय असणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या कामकाजाची कुंडली सादर करण्याचे निर्देश शिवसेनेच्या पश्चिम विदर्भाचे संपर्क प्रमुख खासदार अरविंद सावंत यांनी जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांना दिले आहेत. शिवसेनेची वाटचाल गतिमान करण्यासाठी पक्षात फेरबदल होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
२०१४ मधील विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपमधील युती संपुष्टात आल्यानंतर राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून शिवसेना स्वबळावर उदयास आली. युतीच्या मुद्यावरून सेना-भाजपमध्ये निर्माण झालेले मतभेद दिवसेंदिवस वाढल्यामुळे की काय, भाजपसोबत सत्तेत सामील झालेल्या शिवसेनेने सरकारमध्ये राहून विरोधकाची भूमिका निभावणे पसंत केले आहे. त्यानंतर राज्यात पार पडलेल्या जिल्हा परिषद, दहा महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपसोबत युती न करता स्वबळावर लढणे पसंत केले. आगामी दोन वर्षांनंतर लोकसभा आणि त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजतील.
त्यामुळे स्वबळावर लढण्यासाठी शिवसेनेने कर्जमुक्तीचा विषय पुढे करत शिवसंपर्क अभियानच्या माध्यमातून पक्ष बांधणीवर जोर दिल्याचे दिसून येते.
शिवसंपर्क अभियानच्या माध्यमातून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (१५ मे) अकोला, बुलडाणा आणि अमरावती जिल्ह्यातील शिवसेनेच्या कार्यकारिणीचा लेखाजोखा घेतला. यावेळी तीनही जिल्ह्यातील संघटनात्मक फेरबदल करण्याचे पक्ष प्रमुखांनी स्पष्ट केले होते. त्या धर्तीवर शिवसेनेचे पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख खा. अरविंद सावंत यांनी पक्षात पदाधिकारी म्हणून मिरवणाऱ्या परंतु कामचुकार आणि गटातटाच्या राजकारणाला खतपाणी घालणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या कामकाजाची इत्थंभूत माहिती सादर करण्याचे निर्देश जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांना दिले आहेत.

युवा सेनेसाठी हवा तळागाळातील कार्यकर्ता
युवा सेनेचे जिल्हाप्रमुख पद रिक्त असून, या पदासाठी शिवसेनेतील पदाधिक ाऱ्यांची मुले, भाऊ, नातेवाईक असे दावेदार समोर केले जात आहेत. त्यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्या झटकण्यासाठी काम करायचे का, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. अशावेळी सर्वसामान्यांमध्ये राहणारा तळागाळातील कार्यकर्त्याला युवा सेनेचे पद देणे पक्षाकडून अपेक्षित आहे.

महिला संघटनेबाबत तक्रारींचा पूर!
शिवसंपर्क अभियानादरम्यान सेना नेत्यांनी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला असता महिला संघटनेबाबत अनेक तक्रारी झाल्याची माहिती आहे. महिला संघटन केवळ कागदावर शिल्लक असल्याचे पक्षाला दिसून आले.

शहर कार्यकारिणीत होणार बदल
शिवसेनेच्या शहर कार्यकारिणीत फेरबदल होण्याची शक्यता आहे. पक्षामध्ये जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांसोबतच नवीन कार्यकर्त्यांची फळी उभारली जाणे आवश्यक झाले आहे. त्यानुषंगाने शहर कार्यकारिणीत नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची माहिती आहे.

Web Title: Submit the working hours of the office bearers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.