अकोला : खदान पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचाऱ्याने पोलीस वसाहत परिसरातील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी व एका बाबूच्या त्रासामुळे पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची चर्चा आहे.
खदान पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी संजय सोळंके यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक पोलीस निरीक्षक व पोलीस विभागातील एका बाबूच्या नावाने चिठ्ठी लिहून ठेवल्याची चर्चा पोलीस खात्यात सुरू आहे. त्यांच्या छळाला कंटाळून संजय सोळंके यांनी सोमवारी पोलीस वसाहतीमधील एका निंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. खदान पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविला आहे. या प्रकरणात खदान पोलिसांनी सध्यातरी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. आत्महत्येपूर्वी मृतक संजय सोळंकेंनी एक सुसाईड नोट लिहिल्याची चर्चा आहे. ज्यामध्ये वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे नमूद केल्याची चर्चा आहे. पुढील तपास खदान पोलीस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार विजय नाफडे करीत आहे.
संजय सोळंके यांनी केलेल्या आत्महत्येमागे कौटुंबिक कारण आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत कोणत्याही वरिष्ठ पोलीस अधिकारी, बाबूचे नाव नाही. तपास सुरू आहे. तपासात जे समोर येईल. त्यानुसार पुढील कारवाई करू.
-विजय नाफडे, प्रभारी ठाणेदार खदान पोलीस ठाणे