आजाराला कंटाळून सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 06:57 PM2021-04-10T18:57:24+5:302021-04-10T18:57:41+5:30
Akola News : रुग्णाच्या आत्महत्येनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वाेपचार रुग्णालयात एकच खळबळ उडाली.
अकोला: अन्न नलिकेच्या कर्करोगाला कंटाळून एका ५७ वर्षीय रुग्णाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवार १० एप्रिल रोजी सर्वोपचार रुग्णालयात घडली. हा रुग्ण पातूर येथील रहिवासी असून, त्याच्यावर सर्वोपचार रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक दहा मध्ये उपचार सुरू होते. रुग्णाच्या आत्महत्येनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वाेपचार रुग्णालयात एकच खळबळ उडाली होती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माहितीनुसार, पातुर येथील रहिवासी ५७ वर्षीय रुग्ण अन्न नलिकेच्या कर्करोगाने ग्रस्त असल्याने त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू होते. कर्करोग चौथ्या स्टेजवर असल्याने तेथील डॉक्टरांनी रुग्णाला घेवून जाण्याचा सल्ला नातेवाईकांना दिला होता. त्यानंतर नातेवाईकांनी रुग्णाला मुर्तिजापूर येथील रुग्णालयात दाखल केले होते, मात्र रुग्णाची प्रकृती खालावल्याने तीन दिवसांपूर्वी त्यांना सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथील वॉर्ड क्रमांक दहामध्ये रुग्णावर उपचार सुरू होते, दरम्यान शनिवारी रुग्णाने आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. या घटनेनंतर रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली हाेती.
सलाईनच्या नळीने आवळला गळा
सर्वोपचार रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक दहामध्ये दाखल कर्करोगाने ग्रस्त रुग्णाने शनिवारी दुपारच्या सुमारास अंगावल चादर घेऊन सालाईनच्या नळीने गळाल्या फास लावून आत्महत्या केल्याची माहिती सर्वोपचार रुग्णालय प्रशासनातर्फे देण्यात आली.