- नितीन गव्हाळे लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त आंबेजोगाई, परांडा तालुके वगळता, गतवर्षीच्या सर्वच तालुक्यांमधील शालेय विद्यार्थ्यांना अंडी, दूध, फळे हा पौष्टिक आहार बंद करण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण विभागाने ८ नोव्हेंबर रोजी दिले आहेत. विदर्भासह अकोला जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. ओला दुष्काळाची झळ पोहोचत असताना, शिक्षण विभागाने पौष्टिक आहार बंद करून विद्यार्थ्यांच्या तोंडचा घास पळविला आहे.संपूर्ण राज्यातच ओला दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या हातातून सर्वच पिके निघून गेली आहे. आर्थिकदृष्ट्या शेतकरी खचला आहे. मुलांचे शिक्षण, उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत प्राथमिक शिक्षण संचालनालयाने राज्यात दुष्काळ नसल्याचे अनुमान लावत, दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी गतवर्षी सुरू केलेली पौष्टिक आहार योजना ११ नोव्हेंबरपासून बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. यातून बीड व उस्मानाबाद जिल्ह्यातील आंबेजोगाई व परांडा हे दोन तालुके वगळण्यात आले आहेत. या दोन तालुक्यांमध्ये शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. गतवर्षी अकोला जिल्ह्यात सात तालुक्यांमध्ये शासनाने दुष्काळ जाहीर केला होता. या तालुक्यामधील प्राथमिक शाळांमध्ये शिकणाºया विद्यार्थ्यांना आठवड्यातून तीन दिवस पूरक आहार म्हणून अंडी, दूध, फळे देण्यात येत होती; परंतु आता दुष्काळ नसल्याचे परस्पर गृहीत धरून प्राथमिक शिक्षण संचालनालयाने ही पूरक आहार योजना बंद केली आहे. राज्यात सर्वत्रच पावसाने कहर केला आहे. अकोला जिल्ह्यातसुद्धा ओल्या दुष्काळाची परिस्थिती आहे. सर्वच पिकांची नासाडी झाल्याने, शेतकरी हवालदिल झाला आहे. त्या पृष्ठभूमीवर शासनाने शेतकरी आणि त्याच्या पाल्यांसाठी पूरक आहार योजना सुरू ठेवण्याची गरज आहे. शेतकरी आर्थिक संकटात असताना, पाल्यांना अंडी, दूध व फळे आहार बंद करण्याची गरज नसल्याचे मत शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. शासनाच्या निर्णयामुळे शेतकºयांच्या मुलांच्या तोंडचा घास हिरावून घेतल्याची भावना निर्माण झाली आहे.
आहार योजना बंद करून माहिती सादर करा!प्राथमिक शिक्षण संचालनालयाने आठवड्यातून तीन पूरक आहार म्हणून अंडी, दूध, फळे देण्याची योजना बंद करून शाळा स्तरावर झालेल्या खर्चाची रक्कम अदा करण्यासाठी आवश्यक निधीची माहिती १५ नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.निसर्गाने शेतकºयांच्या तर शिक्षण विभागाने पाल्यांच्या तोंडचा घास हिरावला!अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात शेतकºयांच्या पिकांची नासाडी झाली आहे. निसर्गाने शेतकºयांच्या तोंडचा घास काढून घेतला आहे आणि ओल्या दुष्काळात दिलासा देण्याची गरज असताना, प्राथमिक शिक्षण विभागाने शेतकºयांच्या पाल्यांच्या तोंडचा पूरक आहाराचा घास हिरावला आहे.पूरक आहार बंद केल्याची माहिती नाही; परंतु दुष्काळी परिस्थिती असताना, पूरक आहार योजना बंद करणे चुकीचे आहे. याबाबत माहिती घेऊन ही योजना पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करू.- विशाल सोळंकी,राज्य आयुक्त, शिक्षण विभाग