अकोला-पूर्णा ब्रॉडगेज रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणासाठी सर्वेक्षण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 01:28 AM2018-01-16T01:28:56+5:302018-01-16T01:35:15+5:30
अकोला : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील अकोला-पूर्णा या २0८ कि.मी. ब्रॉडगेज रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण्याची उपयुक्तता तपासण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्वेक्षणाच्या कामाला १२ जानेवारीपासून प्रारंभ झाला असून, मुदखेड ते पूर्णादरम्यान ७0 कि.मी. अंतराचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.
राम देशपांडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील अकोला-पूर्णा या २0८ कि.मी. ब्रॉडगेज रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण्याची उपयुक्तता तपासण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्वेक्षणाच्या कामाला १२ जानेवारीपासून प्रारंभ झाला असून, मुदखेड ते पूर्णादरम्यान ७0 कि.मी. अंतराचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.
खासदार संजय धोत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत ११ जानेवारी रोजी नांदेड येथे पार पडलेल्या एका बैठकीत द. मध्यचे महाप्रबंधक विनोदकुमार यादव यांनी हा निर्णय जाहीर केला. मार्च २00८ मध्ये अकोला-पूर्णा रेल्वे मार्गाच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले. त्यानंतर १00 कि.मी. प्रतीतास या वेगाने डीझल इंजिनच्या सहाय्याने या मार्गावर गाड्या धावू लागल्या. या मार्गावर अधिक वेगाने गाड्या चालवायचा असतील, तर विद्युतीकरणाशिवाय पर्याय नाही, असे खा.धोत्रे बैठकीत स्पष्ट केले. त्यानुसार विद्युतीकरणासाठी आवश्यक असलेल्या सर्वेक्षणाला १२ जानेवारीपासून विभागात प्रारंभ झाला असून, मुदखेड ते पूर्णा या ७0 किमी रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असल्याची माहिती विभागीय माहिती अधिकार्यांनी ‘लोकमत’ला दिली. विद्युतीकरणासाठी सुरू करण्यात आलेल्या सर्वेक्षणात रेल्वे मार्गाच्या प्रत्येक फुटावर मार्किंग केले जाणार असून, एक नियोजनबद्ध आराखडा तयार केला जाणार आहे. पाच तज्ज्ञांचा समावेश असलेल्या चार टीमच्या माध्यमातून सर्वेक्षणाचे काम सुरू झाले असून, यामध्ये रेल्वे पूल, लेवल क्रॉसिंग, वळण मार्ग, सिग्नल, पॉइंट अँन्ड क्रॉसिंग या सर्व बाबींची इत्थंभूत माहिती गोळा केली जात आहे.
सर्वेक्षणात गोळा केली जाणारी माहिती रेल्वेला विद्युत पुरवठा करणार्या ‘महाट्रान्स्को’ या विद्युत कंपनीलासुद्धा उपयुक्त ठरणार असून, त्याआधारे त्यांना रेल्वे मार्गालगत ठिकठिकाणी सबस्टेशन व मेंटेनन्स डेपो तयार करणे शक्य होणार आहे. सर्वेक्षणाचे काम पूर्ण होताच, २ हजार २00 कोटी रुपये खर्च प्रस्तावित असलेल्या या कामासाठी निविदा काढण्यात येणार असल्याचे विभागीय माहिती अधिकार्यांनी सांगितले.
‘मॉडेल’ रेल्वे स्थानकाला प्राप्त होणार अभूतपूर्व महत्त्व
जयपूर-सिकंदराबाद हा १ हजार ४६९ कि.मी.चा रेल्वे मार्ग अकोल्यातून जातो. त्यापैकी जयपूर-इंदूर व अकोला-सिकंदराबादचा रेल्वे मार्ग ब्रॉडगेजमध्ये रूपांतरी झाला असून, अकोला-अकोट या दरम्याच्या मार्ग परिवर्तनास गतवर्षात प्रारंभ झाला. अकोला-पूर्णाप्रमाणेच अकोला-अकोट दरम्यानचे विद्युतीकरणाचे काम मार्ग परिवर्तनानंतर हातोहात करण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे ‘मॉडेल’ रेल्वेस्थानकाला लवकरच अभूतपूर्व महत्त्व प्राप्त होणार आहे.