- राजरत्न सिरसाटअकोला: ‘सुवर्ण शुभ्रा’ सोन्यासारखं उत्पादन देणारी (पांढर सोनं) कापसाची नवीन जात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे. पांढऱ्या सोन्याला पिवळ्या सोन्यासारखे दर मिळतील का, हे आता बघावे लागणार आहे. मजुरांची वानवा बघता कापूस वेचणी यंत्राने करता यावी, यासाठीचे बियाणे संशोधन या कृषी विद्यापीठाने हाती घेतले आहे.या कृषी विद्यापीठाने आतापर्यंत १५ च्यावर कपाशी जाती विकसित करू न शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे; परंतु बीटी कपाशीने तीन दशकांपूर्वी भारतात प्रवेश केला आणि बीटी कपाशीमुळे उत्पादन वाढते, असा प्रचारही धूमधडाक्यात झाल्याने या बीटीने देशातील ९० टक्के बाजारपेठ काबीज केली. प्रत्यक्षात बीटी कपाशीमध्ये गुलाबी बोंडअळीला प्रतिकार करणारा जीन आहे. आता जेव्हा बीटीवरही गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने हे निदर्शनास आले. त्यामुळे शेतकरी पुन्हा देशी कपाशीकडे वळत असून, गत पाच वर्षांत देशी कपाशीचे क्षेत्र वाढत आहे. म्हणूनच डॉ. पंजाबराव देशमुख व स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने देशी कपाशी बियाण्यामध्ये हा जीन टाकून बीजी-२ कपाशी बियाणे बाजारात आणले आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे देशी कपाशी बियाण्याची मागणीही वाढतीच आहे. या पृष्ठभूमीवर कृषी विद्यापीठाने नवे संशोधन हाती घेतले असून, ‘सुवर्ण शुभ्रा’ हा त्याचाच परिपाक आहे.‘सुवर्ण शुभ्रा’ कपाशीचे उत्पादन इतर सर्वच पारंपरिक जातीपेक्षा जास्त असल्याचा दावा कृषी संशोधकांनी केला आहे. १५० ते १६० दिवसांत येणारी कोरडवाहू क्षेत्रासाठी ही कपाशी आहे. या कपाशीच्या बोंडाचे वजन ३.७ ते ४ ग्रॅम आहे. उत्पादन हेक्टरी १३ ते १६ क्ंिवटल आहे. रुईचा उतारा ३५ ते ३६ टक्के एवढा आहे. धाग्याची लांबी २७ ते २९ मि.मी. असून, तुडतुडे आणि इतर रोगास प्रतिकारक आहे. राज्यस्तरीय संशोधन समितीमध्ये (जॉइंट अॅग्रोस्को) ‘सुवर्ण शुभ्रा’ला मान्यता दिली आहे. यावर्षी ही जात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.‘सुवर्ण शुभ्रा’ कपाशी इतर पारंपरिक जातीपेक्षा अधिक उत्पादन देणारी आहे. विशेष म्हणजे, तुडतुडे आणि इतर रोगास प्रतिकारक आहे. ही जात शेतकºयांच्या पसंतीला उतरेल, असा विश्वास आहे.डॉ. डी. टी. देशमुख,विभाग प्रमुख,कापूस संशोधन विभाग,डॉ. पंदेकृवि, अकोला.