सुवर्ण शुभ्राचे बियाणे अकोला, बुलडाण्यातच मिळणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 10:55 AM2020-06-07T10:55:28+5:302020-06-07T10:55:51+5:30
रस शोषण किडींना प्रतिकारक हे बियाणे यावर्षी केवळ अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यातच उपलब्ध आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने देशी कपाशीसह बीटी कपाशी बियाण्यांवर संशोधन केले असून, सुवर्ण शुभ्रा नावाने बियाणे उपलब्ध केले आहे. रस शोषण किडींना प्रतिकारक हे बियाणे यावर्षी केवळ अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यातच उपलब्ध आहे. इतरही देशी कपाशीचे बियाणे कृषी विद्यापीठ यावर्षी शेतकऱ्यांना उपलब्ध करणार आहे.
देशात सर्वत्र बीटी कपाशीचे क्षेत्र वाढले असून, देशी कापूस नाममात्र उरला आहे. या बीटीला तोंड देण्यासाठी या कृषी विद्यापीठाने बीटीसह अनेक नवे देशी कापसाचे बियाणे संशोधन केले आहे. पावसाचा ताण सहन करणारे व कमी दिवसात येणाºया कापसाच्या बियाण्याचा यामध्ये समावेश आहे. अतिघनता लागवड पद्धतीने देशी कापसाचे उत्पादन घेतल्यास बीटी कापसाच्या बरोबरीने उत्पादन येत असून, हा कापूस काढल्यांनतर या क्षेत्रावर दुबार म्हणजेच रब्बी पीक घेता येते, असा दावा कृषी विद्यापीठाने केला आहे. देशी कपाशीचे ७ ते ८ क्विंटल बियाणे यावर्षी कृषी विद्यापीठाकडे उपलब्ध आहे. यामध्ये ०८१ जातीचे ६ क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. तसेच देशी रजतचे २ क्विंटल ५० किलो बियाणेदेखील उपलब्ध आहे. तसेच कृषी विद्यापीठाने ०८१ नावाने बीटी कपाशीचे बियाणे विकसित केले असून, या जातीचे ७० क्विंटल बियाणे महाबीजकडे उपलब्ध आहे. ४६८ पीकेव्ही हायब्रीड -२ हे २० हजार पाकीट तर पीडीकेव्ही जेकेएएल ११६ ची १,६०० पाकीट उपलब्ध आहेत.
यामध्ये प्रामुख्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या देशी कपाशी वाणांचा समावेश आहे. देशी कापसाचा पेरा वाढावा, हा यामागे उद्देश असून, गतवर्षी बºयाच शेतकऱ्यांनी देशी कापसाची पेरणी केली आहे. यावर्षी कृषी विद्यापीठाने प्रथमच ०८१ आणि रजत या दोन बीटी कपाशीच्या जाती पेरणीसाठी उपलब्ध केल्या आहेत.
यावर्षी सुवर्ण, शुभ्रासह ०८१ आणि रजत या दोन बीटी कपाशीचे बियाणे प्रथमच शेतकºयांना उपलब्ध करण्यात येणार आहे. इतरही देशी कपाशीचे बियाणे उपलब्ध आहेत.
- डॉ. विलास खर्चे,
संशोधन संचालक,
डॉ. पंदेकृवि, अकोला.