अकाेला शहरात डुकरांचा उच्छाद; आयुक्त म्हणाल्या तुम्हीच उपाय सूचवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 10:56 AM2021-03-31T10:56:14+5:302021-03-31T10:56:52+5:30
Pigs in the city of Akola : मनपाच्या स्वच्छता व आराेग्य विभागाने शहरातील साफसफाईच्या कामांकडे पध्दतशीरपणे दुर्लक्ष केले आहे.
अकाेला: शहरात माेकाट डुकरांनी उच्छाद मांडला असून मागील अडीच महिन्यांच्या कालावधीत सुमारे ९० पेक्षा अधिक डुकरांचा मृत्यू झाला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याप्रकरणी सत्तापक्षातील नगरसेवकांनी मनपा आयुक्तांकडे ही समस्या निकाली काढण्याची विनंती केली असता त्यावर तुम्हीच उपाय सुचवा,त्यानंतर मार्ग काढता येइल,असे आयुक्तांनी स्पष्ट केल्याने नगरसेवकांसमाेर पेच निर्माण झाला आहे.
काेराेनाच्या सबबीखाली मनपाच्या स्वच्छता व आराेग्य विभागाने शहरातील साफसफाईच्या कामांकडे पध्दतशीरपणे दुर्लक्ष केले आहे. आजराेजी शहराच्या कानाकाेपऱ्यात घाणीने तुडूंब साचलेल्या नाल्या,गटारे, धुळीने माखलेले रस्ते, ठिकठिकाणी साचलेला कचरा असे चित्र दिसून येत आहे. अशा परिस्थितीत अज्ञात साथराेगामुळे शहराच्या विविध भागात डुकरांचे मृत्यू हाेत आहेत. याची सुरूवात दक्षिण झाेनमधील प्रभाग क्रमांक १९ मध्ये झाली हाेती. दिड महिन्यांपूर्वी प्रभाग १९ मध्ये सहा ते सात दिवसांच्या कालावधीत सुमारे २९ डुकरांचा मृत्यू झाला हाेता. त्यानंतर प्रभाग क्रमांक १, ८, ९, १६, १७, १८ व त्यापाठाेपाठ प्रभाग १० मध्ये डुकरांची कलेवरे आढळून आली हाेती. यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याविषयी ‘लाेकमत’मध्ये वृत्त उमटल्यानंतर भाजपचे नगरसेवक अजय शर्मा, शिवसेनेच्या नगरसेविका मंजूषा शेळके यांनी मनपा आयुक्त निमा अराेरा यांच्याकडे हा मुद्दा उपस्थित केला. त्यावर ही समस्या निकाली काढण्यासाठी प्रशासन पूर्ण प्रयत्नरत असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. ही व्यापक समस्या असल्याने नगरसेवकांनी उपाय सुचविल्यास माेहीम अधिक प्रभावीपणे राबविता येइल,असे आयुक्तांनी सांगितले.
वराह पालन करणाऱ्यांवर कारवाई का नाही?
शहरात यापूर्वी माेकाट डुकरांना पकडण्याचा प्रयाेग प्रभाग क्रमांक १२ मध्ये करण्यात आला हाेता. त्यावेळी काही वराह पालन करणाऱ्या व्यावसायिकांनी डुकरे पकडणाऱ्या चमूतील सदस्यांना मारहाण केली हाेती. वराह पालन करणारे बहुतांश व्यावसायिक महापालिकेत सफाई कर्मचारी पदावर कार्यरत आहेत. ही बाब लक्षात घेता मनपा प्रशासनाने वराह पालन करणाऱ्या व्यावसायिकांविराेधात कारवाईचा बडगा उगारण्याची गरज आहे.
कर्मचारी संघटनेकडेच ताेडगा!
शहरात वराह पालन करणारे व्यावसायिक महापालिकेत सफाई कर्मचारी पदावर सेवारत आहेत. यातील बहुतांश कर्मचारी सफाई कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी आहेत. अकाेलेकर माेकाट डुकरांमुळे त्रस्त असल्याने या समस्येवर उपाय देखील सफाई कर्मचारी संघटनेकडेच आहे. शहरवासियांचे आराेग्य पाहता संघटना व प्रशासन काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.