सफाई कर्मचारी, घंटागाडी चालकांच्या आरोग्य तपासणीला ‘खो’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 04:47 PM2020-04-24T16:47:03+5:302020-04-24T16:47:17+5:30
गत महिनाभरापासून संबंधितांची एकदाही आरोग्य तपासणी न झाल्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
अकोला: देशभरासह संपूर्ण राज्यात थैमान घालणाºया कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी महापालिका प्रशासनाची यंत्रणा कामाला लागली आहे. यातही कोरोना ‘पॉझिटिव्ह’ आढळून आलेल्या भागात साफसफाईची कामे करणारे सफाई कर्मचारी, घंटागाडी चालक तसेच घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी करणारे महापालिकेचे शिक्षक व आशा वर्कर यांच्या आरोग्य तपासणीकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे. गत महिनाभरापासून संबंधितांची एकदाही आरोग्य तपासणी न झाल्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
कोरोना विषाणूची साखळी खंडित करण्यासाठी महापालिका प्रशासनाने विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. अशाही परिस्थितीत महापालिका क्षेत्रातील उत्तर झोनमध्ये ७ एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर याच झोनमधील आणखी सात जण कोरोना बाधित असल्याचे समोर आले. शहरात रुग्णांच्या संख्येला आळा घालण्यासाठी महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी उत्तर झोनमधील प्रभाग क्रमांक ११ व प्रभाग क्रमांक दोनला प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहे. या दोन्ही प्रभागांमध्ये नागरिकांच्या दैनंदिन आरोग्य तपासणीसाठी महापालिकेचे शिक्षक तसेच आशा वर्कर कामाला लागले आहेत. याव्यतिरिक्त या दोन्ही प्रतिबंधित भागात दैनंदिन साफसफाई करण्यासाठी मनपाचे सफाई कर्मचारी जात आहेत. गत महिनाभरापासून या प्रतिबंधित क्षेत्रात महापालिकेचे शिक्षक व आशा वर्कर आरोग्य तपासणी जात असल्यामुळे त्यांनाही संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या दोन्ही प्रभागांसह शहराच्या विविध भागात सर्व्हिस लाइन तसेच नाल्यांची दैनंदिन साफसफाई व स्वच्छतेची कामे सफाई कर्मचारी नियमितपणे करीत आहेत. शहरातील कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेता व नागरिकांकडून ‘सोशल डिस्टन्सिंग’चे होणारे उल्लंघन लक्षात घेता महापालिका प्रशासनाने तातडीने शिक्षक, आशा वर्कर, सफाई कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
महापालिका क्षेत्रात कोरोना ‘पॉझिटिव्ह’ आढळून आलेल्या रुग्णांच्या प्रतिबंधित क्षेत्रात असो वा इतर ठिकाणी साफसफाईची कामे करणारे सफाई कर्मचारी, घंटागाडी चालक यांच्या आरोग्याची तपासणी करण्याचे निर्देश स्वच्छता व आरोग्य विभागाला दिले आहेत.
- संजय कापडणीस, आयुक्त, मनपा.