अनेकांची कार्यक्षमता होते कमी
सर्वोपचार रुग्णालयातील तज्ज्ञांच्या मते, कोरोनामुक्तीनंतर अशक्तपणा जाणवणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर अनेकांची कार्यक्षमता कमी होत असल्याने प्रतिकारशक्ती विकसित होण्यास कालावधी लागतो. त्यामुळे अनेकांमध्ये अशक्तपणा जाणवतो. यावर वैद्यकीय सल्ला, पुरेशी विश्रांती, व्यायाम आणि योग्य आहार महत्त्वाचा आहे.
ही लक्षणे ओळखा
कोरोनातून बरे झाल्यानंतर चालताना दम लागणे, छातीत दुखणे, चक्कर येणे, जीव घाबरणे आदी लक्षणे आढळून येतात. ही लक्षणे हृदयरोगाशी निगडित असू शकतात. त्यामुळे परस्पर औषधोपचार न करता, तज्ज्ञांकडून वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात येते.
कोरोनातून बरे झालेल्या व पोस्ट कोविड तपासणी केलेल्या काही रुग्णांमध्ये फुप्फुसाच्या फायब्रोसिसशी संबंधित लक्षणे आढळत आहेत. याशिवाय रुग्णांमध्ये हृदयाशी संबंधित तक्रारीही समोर येऊ शकतात. कोरोनानंतर हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊन गुंतागुंत वाढू शकते. त्यामुळे वेळीच काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
- डॉ. मुकुंद अष्टपुत्रे, औषध वैद्यकशास्त्र विभाग, जीएमसी