लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शिवसेनेमध्ये शब्दाला प्रमाण मानले जाते. त्याचे भान काही राजकीय पक्षांना राहत नसल्यामुळेच त्यांच्यावर विपरीत राजकीय परिस्थिती ओढवते. शिवसेना जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विकासाप्रती बांधील आहे. आम्ही शब्द देतो, राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ मिळवायचा असेल, तर जिल्हा परिषदेची सत्ता काबीज करण्याचे आवाहन माजी केंद्रीय मंत्री, शिवसेना नेते तथा खासदार अरविंद सावंत यांनी उपस्थित शिवसैनिकांना केले.शिवसेनेच्यावतीने शुक्रवारी स्थानिक मराठा मंगल कार्यालयात जिल्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना नेते तथा खा. अरविंद सावंत यांनी जिल्हाभरातून जमलेल्या असंख्य शिवसैनिकांना मार्गदर्शन करीत पक्षातील काडीबाजांना इशारा देत भाजपचा खरपूस शब्दात समाचार घेतला. शिवसेनेच्या तिकिटावर जिल्हा परिषद निवडणूक लढविणाऱ्यांची संख्या वाढली, ही पक्षासाठी जमेची बाजू असली तरी तिकीट वाटप करताना आमची होणारी अडचण तुम्ही समजून घेतली पाहिजे. स्वत:च्या कुटुंबातील व्यक्तीलाच तिकीट मिळाले पाहिजे, असा अट्टहास करू नका. पक्षात अनेक वर्षांपासून खस्ता खाणाºया निष्ठावान पुरुष किंवा महिला शिवसैनिकांसाठीही पुढाकार घ्या, कधीतरी मोठ्या मनाचे व्हा, दिलदार व्हा, अशा भावनिक शब्दात खा. अरविंद सावंत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. राज्यातून शिवसेनेला संपविण्याचा काही राजकीय पक्षांचा कुटील डाव होता; परंतु सेनेचा देव वाली असल्यामुळे त्याने न्याय केला आणि काही पक्षातील १०५ हुतात्म्यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री बसविल्याची बोचरी टीका यावेळी खा. सावंत यांनी केली. व्यासपीठावर संपर्क प्रमुख प्रकाश शिरवाडकर, अमरावती संपर्क प्रमुख दिलीप जाधव, श्रीरंग पिंजरकर, मा. आ. संजय गावंडे, सेवकराम ताथोड, विजय मालोकार, गोपालराव दातकर, दिलीप बोचे, महादेवराव गवळे, उमेश जाधव, राजेश मिश्रा, अतुल पवनीकर, माया म्हैसने, ज्योत्स्ना चोरे, देवश्री ठाकरे, मंजूषा शेळके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
प्रवेश करणाऱ्यांना बांधले शिवबंधनसेनेच्या जिल्हा मेळाव्याचे औचित्य साधत विविध राजकीय पक्षांचे सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधणाºया बाळापूर तालुक्यातील उमेश जाधव यांच्या मार्गदर्शनात ३२ सरपंच आणि चारशेपेक्षा अधिक कार्यकर्त्यांना खा. अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधण्यात आले.
‘मातोश्री’वर बाळापूर जिंकणार नसल्याची कोल्हेकुई!शिवसेनेला नितीन देशमुख सारखा लढवय्या शिवसैनिक भेटला; परंतु काहींनी बाळापूर विधानसभा मतदारसंघात आपला पराभव अटळ असल्याची कोल्हेकुई ‘मातोश्री’वर केली होती. अशा प्रकाराची संबंधितांना लाज वाटली पाहिजे, या शब्दात खा. सावंत यांनी समाचार घेतला.
स्वप्न पाहणाºयांनी कामेसुद्धा करावीत!पक्षात मंत्री पद किंवा आमदारकी मिळावी, याचे स्वप्न पाहणे गैर नाही; परंतु त्यासाठी संबंधितांनी काड्या करण्यापेक्षा पक्षवाढीसाठी कामेसुद्धा करावीत, असा टोला खा. अरविंद सावंत यांनी लगावला. जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी पीडीकेव्हीच्या सभागृहात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना अन्नधान्य व इतर साहित्याच्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमानंतर झालेला प्रकार मी आजही विसरलो नसल्याचे स्पष्ट करीत खा.सावंत यांनी पक्षांतर्गत विरोधकांची वाट सोपी नसल्याचे संकेत दिले.