दर्यापूर (अमरावती) : अकोला जिल्ह्यातील मौजा कपिलेश्वर येथील रेतीघाटातून ट्रॅक्टरने रेती वाहतूक करण्यास मुभा देण्यासाठी १५ हजारांची लाच घेणाºया तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रात्री ७.३० च्या सुमारास रंगेहाथ पकडले. बुधवारी पहाटे सहाच्या सुमारास येवदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अकोला जिल्ह्यातील अपोती बु. व दापुरा येथील तलाठी प्रमोद पुंडलिकराव लांडगे (४३, रा. फतेपूरवाडी, मोठी उमरी, अकोला) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. त्याने सदर ट्रॅक्टरमालकाला ९ मे रोजी १५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. सदर ट्रॅक्टरमालकाने यासंबंधी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी १४ मे रोजी सापळा रचला. तलाठी प्रमोद लांडगे हा दर्यापूर तालुक्यातील करतखेड येथे गणराज कोल्ड्रिंक्स येथे रक्कम घेण्यासाठी पोहोचला. यावेळी त्याला रंगेहाथ अटक करण्यात आली. त्याच्याकडून १५ हजारांची रक्कम जप्त करण्यात आली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अमरावती येथील पोलीस निरीक्षक दीप्ती जोशी यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणात येवदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.