ग्रामसेवकांच्या संपातही दिले विकास कामांचे टार्गेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 02:02 PM2019-08-27T14:02:12+5:302019-08-27T14:02:17+5:30
ग्रामपंचायती आणि ग्रामसेवकांशी संबंधित कामे ठरावीक वेळेत पूर्ण करण्यासाठी नियोजन दिले आहे.
अकोला: शासनाकडे प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्या, यासाठी राज्यभरात ग्रामसेवकांचे काम बंद आंदोलन सुरू असतानाच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गावातील ३३ कामांच्या प्रगतीबाबत ग्रामपंचायतीला विचारणा केली आहे. सोबतच विविध जबाबदाºया पार पाडण्याचेही पत्र दिल्याने ग्रामसेवकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
राज्यातील ग्रामसेवकांनी २२ आॅगस्टपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्याचवेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील ग्रामपंचायती आणि ग्रामसेवकांशी संबंधित कामे ठरावीक वेळेत पूर्ण करण्यासाठी नियोजन दिले आहे. एकीकडे आंदोलन सुरू असताना दुसरीकडे कामाबाबतचा पाठपुरावा सुरू झाल्याने ग्रामसेवकांमध्ये अस्वस्थता निर्माण होत आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या नियोजनात झिरो पेंडन्सी, अभिलेख वर्गीकरणाचे काम पूर्ण करणे, स्थानिक निधीचे सामान्य व विशेष लेखा आक्षेपित आहेत. जनता दरबारासह इतर प्रकारच्या तक्रारींचा १०० टक्के निपटारा करणे, सर्व घरकुल योजनांचे प्रस्ताव ग्रामपंचायत स्तरावर गोळा करणे, त्यासाठी कॅम्प घेणे, नवीन मंजूर घरकुल लाभार्थींना तातडीने मंजुरी पत्र देणे, पहिला हप्ता दिलेल्या घरकुलाचे काम सुरू करणे, गावातील घरकुल निर्मितीसाठी कृती आराखडा तयार करणे, अपूर्ण घरकुल असलेल्यांना सूचना देऊन फोटो काढावे, काम सुरू न केलेल्यांना नोटीस देणे, महिलांचा बचत गटांमध्ये समावेश करणे, सर्व कामांचे जीओ टँगिंग, फोटो अपलोड करणे, शोषखड्डे पूर्ण करणे, रोजगार हमी योजनेच्या कामांची यादी करून फलक लावणे, जॉब कार्डची तपासणी करावी, गावात किती निधी प्राप्त, त्यापैकी किती खर्च झाला, याचा ताळेबंद सादर करणे, काम पूर्ण झाल्यास त्याचे पूर्णत्वाचे प्रमाणपत्र देणे, अखर्चित निधीतील कामे ५ सप्टेंबरपर्यंत सुरू करावी, पाणीपट्टी, घरपट्टी आणि विशेष वसुली किती आहे, ग्रामपंचायतीमधील खातेदारांची संख्या, त्यापैकी नोटीस दिलेल्यांची संख्या किती आहे. अंतिम जप्तीची नोटीस दिलेल्यांची संख्या किती आहे, वसुली देत नसलेल्यांच्या दारावर नोटीस चिकटवावी, आपले सरकार सेवा केंद्र, सीएससी आॅपरेटरचे पेमेंट पाठवण्यात यावे, वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट पूर्ण करावे, जिल्हा परिषदेतील लाभाच्या वस्तूंसाठी निवड झालेल्यांच्या घरी भेट देऊन वस्तू खरेदीसाठी प्रोत्साहन द्यावे, यासारख्या कामांची आठवण पत्राद्वारे करून देण्यात आली आहे. त्यामुळे आता कामबंद आंदोलन करणारे ग्रामसेवक कामाला कितपत सुरुवात करतात, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.